हर्षद कशाळकर
जिल्ह्यातून मुंबईत स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना गावाकडे परत आणण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि स्वदेश फाऊंडेशनच्या वतीने एक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २२५ जणांचे गावातच पुनर्वसन करण्यात आले. शहरातील नोकरीला सोडचिठ्ठी देऊन गावातच काम उभे करण्याच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोकणातील बहुतांश तरुण नोकरीनिमित्ताने मुंबई, ठाणे, सुरत, पुणे आदी महानगरांमध्ये स्थलांतरित होतात. मिळेल ते काम करून चरितार्थ चालवतात. रोजगारांच्या शोधात होणाऱ्या या स्थलांतरणामुळे गावेच्या गावे ओस पडतात. या स्थलांतराला प्रामुख्याने दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक म्हणजे शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न आणि गावात पर्यायी रोजगाराची वानवा.
हे स्थलांतर थांबवण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि स्वदेश फाऊंडेशन यांच्यातर्फे ‘चाकरमान्यांची घरवापसी’ मोहीम राबविण्यात आली. याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. जिल्ह्यात पुनर्वसन करण्यात आलेल्या २२५ पैकी प्रामुख्याने पोलादपूर तालुक्यातील ४५, तळा तालुक्यातील २८, म्हसळा तालुक्यातील १७, श्रीवर्धन तालुक्यातील १५, माणगाव तालुक्यातील ४० आणि महाड तालुक्यातील २७ जणांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत जवळपास ४०० जणांनी आत्तापर्यंत गावाकडे परत फिरण्यासाठी नोंदणी केली आहे. म्हणजेच अजूनही पावणेतीनशे जण पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या मोहिमेला सुरुवात केली होती. यासाठी स्वदेश फाऊंडेशनबरोबर एक सामंजस्य करार करण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा गावाकडे परत येणाऱ्यांना लाभ देणे, त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यासाठी आवश्यक आर्थिक साहाय्य आणि प्रशिक्षण देणे, त्यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करणे या पातळ्यांवर काम केले जात आहे. ग्रामीण विकासाला चालना देणे हादेखील या उपक्रमाचा उद्देश आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘रिव्हर्स मायग्रेशन सेल’ची स्थापना करण्यात आली. या सेलवर थेट जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार आहेत. देशात अशा प्रकारचा विभाग कार्यान्वित करणारा रायगड हा पहिला जिल्हा ठरला आहे.
‘स्वदेश’पासून प्रेरणा
तीन वर्षांपूर्वी स्वदेश चित्रपटापासून प्रेरणा घेऊन हा प्रकल्प सुरू करण्यात आला. सुरुवातीला सामाजिक संस्थेपुरताच हा प्रकल्प मर्यादित होता. नंतर मात्र जिल्हा प्रशासनाने यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घरवापसी करणाऱ्या व्यक्तींना मिळावा यासाठी प्रयत्न सुरू झाले होते.
प्रबोधन, प्रशिक्षण आणि अर्थसाह्य
पुन्हा गावाकडे येणाऱ्यांचे सरुवातीला मुंबईत प्रबोधन केले जाते. नंतर ते जो व्यवसाय करू इच्छितात त्यांचे प्रशिक्षण दिले जाते. तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जाते. अथवा त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होते आणि उत्पन्नाचे साधनही निर्माण होते. आजवर गावाकडे स्थलांतरित झालेल्या व्यक्तींनी हॉटेल, काजू प्रक्रिया उद्योग, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, दुचाकी दुरुस्ती आणि ठिबकसिंचन पद्धतीच्या माध्यमातून शेती आदी व्यवसाय सुरू केले आहेत. दोन जण तर गावात स्थायिक होऊन सरपंच झाले आहेत.
कोकणातून होणारे स्थलांतर रोखणे आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना देणे या दोन पातळ्यांवर हा प्रकल्प कार्य करतो. त्यासाठी लागणारे प्रबोधन आणि प्रशिक्षण आम्ही देतोच. शिवाय घरवापसी करणाऱ्या व्यक्तीला अर्थसाहाय्य करून देण्याची जबाबदारीही पार पाडली जाते – तुषार इनामदार, प्रकल्प समन्वयक, स्वदेश फाऊंडेशन
पूर्वी मी मुंबईत छायाचित्रणाचा व्यवसाय करत होतो. मात्र नंतर घरवापसी मोहिमेअंतर्गत मी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला आज मी गावातच स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. यातून चांगले उत्पन्नही मिळत आहे – संजय येलंगेकर, मोहिमेअंतर्गत घरवापसी करणारे