दापोली – दापोली तालुक्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून, केळशी किनारा मोहल्ल्यात पोलिसांनी छापा टाकून सुमारे चार लाख रुपये किमतीचा चरस जप्त केला आहे. विशेष म्हणजे, या चरसच्या पॅकेजिंगवर “6 Gold” असा इंग्रजी मजकूर आणि काही कोरियन भाषेतील अक्षरे लिहिलेली आढळली आहेत. ज्यामुळे या तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का? असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून, दापोली तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केळशी किनारा मोहल्ल्यातील अब्रार इस्माईल डायली (वय ३२) यांच्या घरावर छापा टाकला. घराच्या मागील बाजूच्या पडवीत केलेल्या तपासणीत पोलिसांना एका गडद लाल आणि सोनेरी रंगाच्या प्लास्टिक वेस्टनमध्ये गुंडाळलेला तपकिरी रंगाचा चरस सापडला.
या वेस्टनवर “6 Gold” आणि कोरियन भाषेतील अक्षरे लिहिलेली होती. यासोबतच चरस साठवण्यासाठी वापरण्यात येणारी एक पांढऱ्या रंगाची कापडी पिशवीही जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या चरसची अंदाजे किंमत ४ लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
संशयित आरोपी अब्रार इस्माईल डायली याच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे दापोली परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध धंद्याला मोठा धक्का बसला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यादव, उपनिरीक्षक पाटील, तसेच हेड कॉन्स्टेबल मोहिते, ढोले आणि कॉन्स्टेबल भांडे, टेमकर, दिंडे, पाटेकर यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आणि अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू ठेवण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.