अलिबाग : पिंडदान हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे. हिंदू घर्मात पक्षात सर्व पितरांचे तर्पण करण्याची पध्दत आहे. घरोघरी ही प्रथा पाळली जाते. त्यामुळे रायगडावर पितरांचे पिंडदान करण्यात गैर काय असा सवाल आता शिवभक्तांनी उपस्थित केला आहे. या वर्षीच नाही तर गेली अनेक वर्षांपासून युध्दात मृत्यूमुखी पडलेल्या यौध्यासाठी हे तर्पण केले जात असल्याचे शिवभक्तांकडून सांगण्यात येत आहे. गडांवरील हिंदू विधीना विरोध करण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

किल्ले रायगडावर राम धुरी आणि त्यांचे सहकारी २००८ पासून हा विधी करत आलेत. रायगडाचे रक्षण करतांना शस्त्राने घायाळ होऊन वीरमरण आलेल्या, हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या, मावळ्यांचे स्मरण म्हणून हा पिंडदान विधी केला जातो. पितृपक्षात ज्या प्रमाणे घराघरात हा विधी केला जातो. त्याच प्रमाणे रायगडावर वीर मावळ्यांचे घर म्हणून तीथे केला जातो. तो हिंदू संस्कृतीचा भाग आहे. त्यावर संभाजी ब्रिगेड संस्थेकडून घेतला जाणारा आक्षेप दुर्दैवी असल्याचे मत शिवभक्तांकडून केला जात आहे. संभाजी ब्रिगेडनी कथीत चित्रफीत व्हायरल करण्यापुर्वी पिंडदानाची पार्श्वभुमी आणि हेतू जाणून घेतला असता तर हा गोंधळ झालाच नसता असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : किल्ले रायगडावर शिवसमाधीसमोर पिंडदान? व्हायरल व्हिडिओमुळे शिवप्रेमींमध्ये संताप, शाक्त शिवराज्यभिषेक दिनी प्रकार उघड

रायगडावर २४ सप्टेंबरला शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून संभाजी ब्रिगेडचे हजारो कार्यकर्ते गडावर आले होते. तर याच दिवशी शस्त्रादहीद पितृ श्राध्द असल्याने राम धुरी आणि त्यांच्या सहकारी शस्त्राने जखमी होऊन वीरगती प्राप्त झालेल्या योध्द्यांच्या पिंडदानासाठी सालाबाद प्रमाणे गडावर दाखल झाले होते. शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी असलेल्या जागेत ते पिंडदान विधी करत होते. संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी हा प्रकार पाहीला आणि आणि त्याची चित्रफीत काढून समाजमाध्यमांवर व्हायरल केली होती. यामुळे गदारोळ उडाला. माजी खासदार आणि रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून असे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करा म्हणून पत्र लिहीले होते. यानंतर आता हिंदुत्ववादी संघटनांनी पुढे येऊन या पिंडदान विधीचे समर्थन केले आहे. यात काहीच गैर नसून तो आपल्या हिंदू संस्कृतीचा भाग आहे. त्यामागच्या भावना समजून घ्या अशी विनंती केली आहे.

हेही वाचा : किल्ले रायगडावरील कथित पिंडदान विधी प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींचं एकनाथ शिंदेंना पत्र, म्हणाले “समस्त देशाचे शक्तीस्थळ…”

पितृपक्षात पितरांची आठवण म्हणून घरोघरी श्राध्द घातली जातात. हा कर्मकांडाचा भाग म्हणून नाही, तर पितराप्रती आदर व्यक्त करण्याचा भाग असतो. त्याच प्रमाणे वीरगती प्राप्त झालेल्या पुर्वजांची आठवण करण्यासाठी रायगडावर आम्ही धार्मिक विधी केले. तर त्यात गैर काय, किमान आरोप करणाऱ्यांनी त्यामागची भूमिका समजून घ्यायला हवी होती. – राम धुरी- शिवप्रेमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम धुरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची शिवाजी महाराजांबद्दल असलेली निष्ठा यावर संशय घेणे अत्यंत चुकीचे आहे. गडासाठी गडावरील लोकांसाठी त्यांनी केलेले काम विसरता येणार नाही. धुरी यांनी स्वतःच्या पुर्वजांचे गडावर तर्पण केले नाही. तर वीरगती प्राप्त झालेल्या योध्द्यासाठी तर्पण केले. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यात काही गैर नाही. गेली अनेक वर्ष हे विधी होत आहेत. – रघुजीराजे आंग्रे, कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज