राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ‘तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली?’ या लोकांच्या प्रश्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर थेट उत्तर दिलं. “आम्ही खूप कष्ट घेतले. आम्ही रोज भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. लोक कधीकधी म्हणतात एवढी संपत्ती कोठून आली. अरे लहानपणापासून आम्ही मेहनत केली आहे,” असं मत छगन भुजबळांनी व्यक्त केलं. ते गुरुवारी (१३ ऑक्टोबर) त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलत होते. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह महाविकासआघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले, “मी आणि माझा भाऊ आम्ही लहान होतो. त्यावेळी भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. तिथे जाऊन थोडी भाजी द्या हो म्हणत भाजीपाला गोळा करायचो आणि ती भाजी माजगावच्या घरासमोरील फुटपाथवर विकायचो. भाजी बाजार लांब असायचा. त्यावेळी टांगे असायचे. या टांग्यांना मागे धरायला जागा असायची. आम्ही गुपचूप जाऊन टांग्याच्या मागे लटकायचो. काही खोडसाळ लोक टांगेवाल्याला सांगायचे आणि टांगेवाला चाबूक मारायचा. तेव्हा आम्ही दोघेही कळवळायचो.”

“लोक कधीकधी म्हणतात एवढी संपत्ती कोठून आली”

“आम्ही खूप कष्ट घेतले. हळूहळू धंदाही वाढत गेला. मी शिक्षणही करत राहिलो. भाऊ पहाटे तीन वाजता जायचा आणि मी पहाटे पाच वाजता जायचो. आरसीएफ, जॉन्सन अँड जॉन्सन अशा मोठमोठ्या कंपन्यांचे वार्षिक ठेके मगन बंधू या नावाने आम्ही दोघा भावांनी घेतले. रोज आम्ही ट्रक भरून भाजीपाला पाठवायचो. लोक कधीकधी म्हणतात एवढी संपत्ती कोठून आली. अरे लहानपणापासून आम्ही मेहनत केली आहे,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

“अख्ख्या बीएसटीचे टायर रिमोल्डिंगमध्ये माझ्याकडे यायचे”

छगन भुजबळ पुढे म्हणाले, “मी प्राणलाल भोगिलाल यांच्या दास अँड कंपनीत मी मॅनेजर होतो. त्यावेळी हिंदुस्थानात सर्वाधिक व्हिंटेज कार त्यांच्याकडे होत्या. अण्णासाहेब माझे मित्र. मी माथाड्यांचे ठेकेही घेतले. त्यातही दोन पैसे मिळाले. अंजिरवाडीत रबरेक्स नावाची कंपनी बंद पडली होती. मालकच सोडून गेला होता. कोणालाच पगार नव्हता. कामगार म्हटले कंपनी घ्या, चालवा आणि हळूहळू आमचा पगार द्या. तेव्हा अख्ख्या बीएसटीचे टायर रिमोल्डिंगमध्ये माझ्याकडे यायचे.”

हेही वाचा : “पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव देण्यात भुजबळांचे योगदान”; शरद पवारांचे अमृत महोत्सवानिमित्त गौरवोद्गार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुंबई आणि गोवा पहिली लग्झरी बस छगन भुजबळने सुरू केली”

“असं असताना लोक विचारतात कसे आले पैसे कसे आले पैसे. मी पनवलेला आणखी एक कंपनी घेतली. मुंबई आणि गोवा पहिली लग्झरी बस भवानी ट्रॅव्हल्स नावाने छगन भुजबळने सुरू केली. सिनेमाही काढले. अनेक उद्योग सुरू होते,” असंही भुजबळांनी नमूद केलं.