“…कधी कधी लोकांना विनोद करायची हुक्की येते”; लाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भुजबळांना फुटलं हसू!

त्यांच्या या मिश्किल हास्यातूनच उपस्थितांना त्यांची प्रतिक्रिया कळाली

Chhgan bhujbal
प्रसाद लाड यांच्या शिवसेना भवन फोडण्याच्या वक्तव्याबद्दल विचारल्यावर भुजबळ यांनी हसत हसतच पहिला प्रश्न केला, "कोण प्रसाद लाड?"

भाजपा आमदार प्रसाद लाड सध्या चांगलेच चर्चेत आहे ते त्यांच्या वक्तव्यामुळे. वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू, या त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शिवसेनेचे अनेक नेते, कार्यकर्ते त्यांच्या या विधानामुळे संतप्त झाले असले तरी छगन भुजबळ यांना मात्र प्रसाद लाड यांचं हे वक्तव्य ऐकून चक्क हसू फुटलं.

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांना भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारलं. तेव्हा भुजबळ यांना हसू अनावर झालं आणि त्यांनी उत्तर दिलं, “काही लोकांना अधूनमधून विनोद करायची फारच हुक्की येते”, आणि पुन्हा हसत हसतच ते तिथून निघून गेले.

हेही वाचा -“शिवसेना भवन फोडणं हे फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोपं नाही”; शिवसेना आमदाराचा संताप

शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केलेले, नंतर काँग्रेस आणि मग आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले छगन भुजबळ यांनी कमी शब्दांतच प्रसाद लाड यांचा समाचार घेतला. सुरुवातीला तर त्यांनी कोण प्रसाद लाड? असा प्रतिप्रश्न करत त्यांना फारसं महत्त्व देण्याचं आवश्यकता नाही, असंच जणू अधोरेखित केलं. त्यांच्या या मिश्किल हास्यातूनच त्यांची प्रतिक्रिया कळून चुकली.

काय म्हणाले होते भाजपा आमदार प्रसाद लाड?

“भाजपाची ताकद काय आहे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण दाखवून दिलं होतं. कारण, त्यावेळी जी भाजपा होती, भाजपाला मानणारा कार्यकर्ता विचाराचा जो मतदार होता. तो मतदार आज देखील भाजपा बरोबर आहे आणि आता तर सोने पे सुहागा हुआ है…कारण नारायण राणे व राणे कुटुंबीयांना मानणारा देखील खूप मोठास्वाभिमानीचा गट भाजपामध्ये आला आहे. त्यामुळे भाजपाची ताकद ही निश्चितच दुप्पट झाली आहे. नितेशची पुढच्या वेळी आपण थोडे कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना असं वाटतं की हे माहीममध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर ते देखील करू”, असं प्रसाद लाड म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chhagan bhujbal couldnt stop laughing on comment of bjp mla prasad lad vsk