भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचं शिवसेना भवन फोडण्याचं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचं हे विधान व्हायरल होत असून त्यावर आता राजकीय नेत्यांसोबतच जनतेतूनही प्रतिक्रिया उमटत आहे. शिवसेना भवन फोडणं देवेंद्र फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोपं नाही, असं म्हणत सेनाभवन फोडणाऱ्यांचं थोबाड फोडू असा इशारा शिवसेनेच्या एका आमदाराने दिला आहे.

भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने संतापलेले शिवसेना आमदार राजन साळवी यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा. शिवसेना तुम्हाला पराभवाच्या लाडूचा प्रसाद दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दात त्यांनी लाड यांना सुनावलं आहे.


आपल्या ट्विटमध्ये राजन साळवी म्हणतात, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणा-यांचे थोबाड फोडू. शिवसेना भवनाला हात लावणे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोपं आहे असे काही भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. शिवसेना भवन हे आम्हा शिवसैनिकांचे मंदीर आहे आणि यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींचा सुगंध आहे. आमदार प्रसाद लाड हे शिवसेनेच्या मतांवर विधानपरिषद निवडणूक जिंकले आहेत. त्यांच्यावर शिवसेनेचे व शिवसेना भवनाचे उपकार आहेत. त्यांच्या तोंडी शिवसेना भवन फोडण्याची भाषा शोभत नाही.
प्रसाद लाड यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा. आमचे शिवसैनिक तुम्हाला पराभवाच्या लाडूचा प्रसाद दिल्याशिवाय शांत बसणार नाही.

काय होतं लाड यांचं वक्तव्य?

“भाजपाची ताकद काय आहे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण दाखवून दिलं होतं. कारण, त्यावेळी जी भाजपा होती, भाजपाला मानणारा कार्यकर्ता विचाराचा जो मतदार होता. तो मतदार आज देखील भाजपा बरोबर आहे आणि आता तर सोने पे सुहागा हुआ है…कारण नारायण राणे व राणे कुटुंबीयांना मानणारा देखील खूप मोठास्वाभिमानीचा गट भाजपामध्ये आला आहे. त्यामुळे भाजपाची ताकद ही निश्चितच दुप्पट झाली आहे. नितेशची पुढच्या वेळी आपण थोडे कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना असं वाटतं की हे माहीममध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर ते देखील करू”, असं प्रसाद लाड म्हणाले होते.