मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून मागच्या वर्षभरात चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही काळापासून विस्तवही जात नाही. संधी मिळेल तेव्हा दोन्ही नेते एकमेकांवर टीका करतात. मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असताना रोजच दोन्ही नेते एकमेकांवर टीकास्र सोडत असत. छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली होती. या टीकेला आता छगन भुजबळ यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
लय फडफड करत होता, आता कुठे?
तीन दिवसांपूर्वी पुण्यातील भोर येथे एका कार्यक्रमात बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला होता. मराठा समाजाला संबोधित करत असताना मनोज जरांगे यांच्या पायाजवळून एक सापसुरळी गेली. मंचावर थोडीशी गडबड झाल्यानंतर जरांगे म्हणाले, “येवल्यावरून आली असावी. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर छगन भुजबळ यांचे नाव न घेता मनोज जरांगे पाटील म्हणाले, ते लय फडफड करत होते. स्वतःलाच मोठा समजत होते. आता कुठे गेले? दिसेनासे झालेत. हिमालयात जाऊन झोपले असतील. मी समाजाच्या ताकदीवर अशा लोकांना नीट केले आणि पुढेही करत राहणार.”
मी कुणाला घाबरत नाही – भुजबळ
मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे काय बोलतील, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. मी कोणालाच घाबरत नाही. मराठा समाज सुद्धा माझ्याबरोबर आहे. नाशिक लोकसभेच्या जागेला आधीच उशीर झाला, त्यामुळे मी माघार घेतली. मी घाबरून माघार घेतलेली नाही. पाच लाखांमधील निम्मा मराठा समाज माझ्याबरोबर आहे. ओबीसी, मुस्लीम आणि दलित यांच्या लाखो मतदारांचा मला पाठिंबा आहे. मी सहज दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येऊ शकत होतो. पण वाटाघाटीत वेळ जात असल्यामुळे मी माघार घेतली.
पंकजा मुंडे यांनी नाशिक लोकसभेबाबत भाष्य करताना प्रीतम मुंडेंना तिथून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे विधान केले होते. त्यावर भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला. पंकजा मुंडे यांनी बीडवर लक्ष द्यायला हवे. त्यांनी तिथून निवडून द्यावे, ते अधिक महत्त्वाचे आहे. नाशिकमध्ये चांगले चांगले उमेदवार असून त्यांच्यात स्पर्धा आहे.