केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्याबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर सोमवारी दोन्ही गटाला नवे नाव आणि चिन्ह वाटप करण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ असे नाव मिळाले असून शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे. तर उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेकडून ‘मशाल’ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन आमदार छगन भुजबळ यांनीही ‘मशाल’ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. दरम्यान, आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘मशाल’ हे चिन्ह का निवडले याचे कारण सांगितले.

हेही वाचा – Shinde vs Thackeray: ‘धगधगती मशाल’ पक्षचिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मशालीचे धोके…”

छगन भुजबळांनी सांगितली आठवण

“आम्ही मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढत होतो. निवडणूक लढवावी, अस आमच्या मनातही नव्हतं. जसा जसा काळ पुढे गेला. आम्ही निवडणुका लढायला लागलो. तेव्हा शिवसेना हा पक्ष नोंदणीकृत पक्ष नव्हता. त्यामुळे आमच्याकडे चिन्हही नव्हते. इंदिरा गांधींच्या हत्यनंतर दोन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी बाळासाहेबांनी अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. मात्र, आमच्याकडे चिन्ह नव्हते. आमचे उमेदवार चेंडू-फळी वगैरे अशी चिन्हे घेत होते. त्यावेळी मी ‘मशाल’ हे चिन्ह घेतले. त्याचे कारण म्हणजे, त्यावेळी आम्ही प्रचाराचा भाग म्हणून भिंतींवर चिन्ह रेखाटत होतो. खरं तर वाघ आम्ही आमचं चिन्ह समजत होतो. मात्र वाघ काढायला कठीण होता. त्यामुळे मी ‘मशाल’ चिन्ह घेतले होते. निकालानंतर मी आमदार म्हणून निवडून आलो होतो”, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.

“मुंबई महानगरपालिकेत आमचा छोटा समुह होता. मी निवडून आल्यानंतर पुढच्या मुंबई महापालिका निवडणुकीत आमच्या सर्व उमेदवारांनी ‘मशाल’ हे चिन्ह घेतले. त्यावेळी आमचे ७० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून होते. त्यानंतर बाळासाहेबांनी मलाच महापौर केले होते. एकाच वेळी आमदार आणि महापौर असणारा मी एकमेव लोकप्रतिनिधी होतो”, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यावेळीसुद्धा मशालीने इतिहास घडेल का असे विचारले असता, ते म्हणाले, “या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक उद्धव ठाकरेंना जड जाणार नाही, त्यांची जागा सहज जिंकून येईल.”