scorecardresearch

IPS अधिकारी मोक्षदा पाटील यांचं बनावट ट्वीटर अकाऊंट उघडून उकळले पैसे, नेमकं काय आहे प्रकरण?

मोक्षदा पाटील यांनी हा सगळा प्रकार म्हणजे बनाव असल्याचं सांगितल्यानंतर हे अकाऊंट बंद करण्यात आलं आहे.

chhatrapati sambhaji nagar fake twitter account in the name-of ips officer mokshada patil cheating of ips officers across the country
वाचा काय घडलं प्रकरण?

महाराष्ट्रातल्या लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांचं फेक ट्वीटर अकाऊंट तयार करण्यात आलं. त्यानंतर या ट्वीटरच्या माध्यमातून पैसे उकळण्यात आले. हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) या ठिकाणी उघडकीस आला आहे. मागच्या काही वर्षांपासून ऑनलाईन फ्रॉडची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. आपला ओटीपी, बँक अकाऊंट नंबर, क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पासवर्ड कुणालाही सांगू नका असं आवाहन बँकांकडून वारंवार करण्यात येतं. तरीही असे प्रकार अनेकदा घडत आहेत. आता महिला आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावाने बनावट ट्वीटर अकाऊंट उघडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे.

नेमकी काय घडली घटना?

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका भामट्याने आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावे बनावट ट्वीटर अकाऊंट उघडलं. त्यानंतर या बनावट ट्वीटर अकाऊंटवरुन या सायबर भामट्याने एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट असून तिच्यावर उपचार सुरु आहेत अशी पोस्टही टाकली. या मुलीला उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचंही या भामट्याने पोस्टमध्ये म्हटलं. उपचार सुरु असलेल्या मुलीसह एका महिलेचा फोटो आणि क्यूआर कोड ट्वीट करून व्हायरल केला. यानंतर हे अकाऊंट आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांचं असल्याचा विश्वास ठेवून देशभरातल्या अनेक आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांनी पैसे पाठवून मदत केली.

मोक्षदा पाटील यांनी काय केलं आवाहन?

या सगळ्या प्रकाराबाबत आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी लोहमार्ग, ग्रामीण आणि शहर सायबर पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला. हे बनावट खाते बंद करण्यासाठी ट्वीटरला रिपोर्ट कळवण्याविषयीही कळवलं. अनेक ठिकाणांहून ट्वीटरला रिपोर्ट गेल्यानंतर २७ मार्चला रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान हे खाते बंद करण्यात आले आहे. या सायबर भामट्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. मोक्षदा पाटील यांनी याबाबत अशी माहिती दिली की, “माझे कुठलेही ट्वीटर खाते नाही. नागरिकांनी सायबर भामट्यांच्या पोस्टला बळी पडू नये.” हे आवाहन मोक्षदा पाटील यांनी केलं मात्र तोपर्यंत अनेक नागरिकांची आणि आयपीएस अधिकाऱ्यांची फसवणूक झाली असल्याचं समोर आलं.

फोन पे च्या माध्यमातून लूट

मोक्षदा पाटील यांचंच हे ट्वीटर अकाऊंट आहे असं भासवत या सायबर भामट्याने फोन पे च्या माध्यमातून पैसे मागवले आहेत. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. कारण थेट आयपीएस अधिकाऱ्याच्या नावेच लूट करण्याचं धाडस आता या भामट्याने दाखवलं आहे. हे करण्यामागे नेमकं कोण आहे? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

मोक्षदा पाटील कोण आहेत?

मोक्षदा पाटील या प्रतिथयश आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्राच्या लेडी सिंघम म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांचे पती हे संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आहेत. या दोघांचीही कायमच माध्यमांमध्ये चर्चा होते. छत्रपती संभाजी नगर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक म्हणून काम करोना काळात मोक्षदा पाटील यांनी जे काम केलं त्याची चांगलीच चर्चा झाली होती. मोक्षदा पाटील या सध्या लोहमार्ग अधीक्षक म्हणून काम करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 13:03 IST

संबंधित बातम्या