Chief Minister Eknath Shinde criticized the opposition party during Balasahebanchi ShivSena party meeting in karad | Loksatta

‘विकासभिमुख कारभारामुळे विरोधकांमध्ये जळफळाट’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

‘टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवावे’, असे खुले आव्हान शिंदेंनी विरोधकांना दिले आहे.

‘विकासभिमुख कारभारामुळे विरोधकांमध्ये जळफळाट’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
फोटो ओळी: ‘बाळासाहेबांची शिवसेना’मध्ये कराडच्या यशवंत विकास आघाडीच्या नेत्यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद कणसे, रणजीतसिंह भोसले व अन्य.

आमच्यावर गद्दारी केली, असा आरोप करणाऱ्यांनी खरेतरं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. त्यांना आम्ही विकासाभिमुख कारभारातून उत्तर देतोय. हा मिंदे गट नव्हे तर बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा शिंदे गट असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. कराडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

हेही वाचा- “आजचं भाषण म्हणजे वैफल्यग्रस्त…” अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

मेळाव्यात पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कराड पालिकेतील यशवंत विकास आघाडीचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, हणमंत पवार, विजय वाटेगावकर यांच्यासह माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेनामध्ये जाहीर प्रवेश केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, की राज्यात गेल्या चार महिन्यात लोकहिताचे निर्णय होताना सामाजिक विकासाने गती घेतल्याने विरोधकांमध्ये जळफळाट होत आहे. त्यातूनच त्यांचे वाट्टेल ते बोलणे सुरु आहे तरी या विरोधकांनी टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवावे, असे खुले आव्हान शिंदे यांनी दिले. खोकी घेणाऱ्यांपैकी नव्हे तर देणाऱ्यांमध्ये आम्ही असल्याने कराडच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल. पन्नास नव्हेतर शंभर कोटींचा निधी देताना मागेपुढे पाहणार नाही. आजच्या राजेंद्र यादव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे इथे विकासाचे नवे पर्वच सुरु झाल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला.

हेही वाचा- “ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”

बाळासाहेब ठाकरे म्हणत की मला एक दिवसासाठी पंतप्रधान करा, काश्मीरमधील ३७० कलम हटवून दाखवतो. ते तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हाच विश्वास मी सगळ्यांना देतोय. तो लोकांना पटतोय. म्हणून तर दररोज पक्षप्रवेश होतच आहेत. आम्हाला कमी चेंडूत जादा धावा कशा काढायच्या, हे चांगले माहीत आहे. त्यामुळे अडीच वर्षांमध्ये राज्यातील सरकार पथदर्शी काम करून दाखवेल असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला. आमदार शहाजीबापू पाटील, महेश शिंदे यांचीही भाषणे झाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 21:50 IST
Next Story
“आजचं भाषण म्हणजे वैफल्यग्रस्त…” अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!