Cidco Affordable Housing Projects in Navi Mumbai: गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता प्रचंड ताणल्या गेलेल्या सिडकोच्या घरांच्या किमती अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईत परवडणाऱ्या दरात घर खरेदीचं स्वप्न उराशी बाळगून विनंती अर्ज करणाऱ्या लाखो अर्जदारांना आता आपलं आर्थिक गणित निश्चित करायला मदत होणार आहे. सिडकोच्या एकूण २६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी आत्तापर्यंत जवळपास एक लाखाहून अधिक अर्ज सादर झाले आहेत. आता त्या घरांच्या किमती जाहीर झाल्यामुळे अर्जदारांची प्रतीक्षा संपली आहे. Cidco च्या संकेतस्थळावर या घरांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सिडकोची ही २६ हजार घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (वार्षिक उत्पन्न ६ लाखांपर्यंत) व अल्प उत्पन्न गटाकरता (वर्षिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा जास्त) नवी मुंबईच्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोड परिसरात उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठीच्या घरांच्या किमती २५ लाखांपासून ४८ लाखांपर्यंत असतील. तर अल्प उत्पन्न गटासाठीच्या घरांच्या किमती ३४ लाख ते ९७ लाखांच्या दरम्यान असतील.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) गट

तळोजा सेक्टर २८ – २५.१ लाख
तळोजा सेक्टर ३९ – २६.१ लाख
खारघर बस डेपो – ४८.३ लाख
बामनडोंगरी – ३१.९ लाख
खारकोपर २ए, २बी – ३८.६ लाख
कळंबोली बस डेपो – ४१.९ लाख

अल्प उत्पन्न घटक (LIG) गट

पनवेल बस टर्मिनस – ४५.१ लाख
खारघर बस डेपो – ४८.३ लाख
तळोजा सेक्टर ३७ – ३४.२ लाख ते ४६.४ लाख
मानसरोवर रेल्वे स्थानक – ४१.९ लाख
खांदेश्वर रेल्वे स्थानक – ४६.७ लाख
खारकोपर पूर्व – ४०.३ लाख
वाशी ट्रक टर्मिनल – ७४.१ लाख
खारघर स्थानक सेक्टर १ए – ९७.२ लाख

१० जानेवारीपर्यंत सिडको मंडळाच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी करु शकतील. प्रधानमंत्री आवास योजनेतून ही घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आत्तापर्यंत घरांच्या किमती माहिती नसल्यामुळे अनेक अर्जदारांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती. मात्र, आता अर्जांची संख्या आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसा कराल Cidco च्या घरासाठी अर्ज?

संबंधित सोडतीच्या प्रक्रियेमध्ये अर्जनोंदणीसाठी इच्छुक https://cidcohomes.com सिडकोच्या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतील. अधिक माहितीसाठी ९९३०८७०००० व ८०६२३६८००० या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क करू शकतील.