प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना केल्याप्रकरणी आता न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने अख्तर यांना प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याने दाखल केलेल्या या तक्रारीमुळे जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असणाऱ्या विवेक चंपानेरकर यांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात ठाण्यातील न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे. अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीमध्ये जावेद अख्तर यांनी पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर रहावे असं नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे प्रकरण?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, असे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला असून भाजपने अख्तर यांच्याकडे माफीची मागणी केली आहे.

भाजपाची टीका
आरएसएस, विश्व हिंदू परिषद हे तालिबानी मानसिकतेचे आहेत. त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. जर संधी मिळाली तर ते सीमाही ओलांडतील, असे जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. त्यावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत विधाने मागे घेण्याची मागणी केली आहे. अख्तर यांनी माफी मागून ते विधान मागे न घेतल्यास त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी दिला होता. अख्तर यांचे वक्तव्य चुकीचे आहे, इतकेच नव्हे हा हिंदू समाजाचा अपमान आहे. हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करीत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जाऊन तालिबानवर टीका करून दाखवावी, असे आव्हानही भातखळकर यांनी केलं होतं. जावेद अख्तर यांचे वक्तव्य निषेधार्ह असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

अख्तर यांचे शब्द नक्की काय होते?
तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांबद्दल जावेद अख्तर म्हणाले, ‘‘त्यांची वक्तव्ये माझ्या लक्षात नाहीत. मात्र अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याचे मोजक्या मुस्लिमांनी समर्थन केले आहे. त्यांची वक्तव्ये ऐकून धक्का बसला. आज भारतातील बहुतेक तरुण मुस्लिमांना चांगली नोकरी आणि त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे असे वाटते. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे प्रतिगामी विचारांचे समर्थन करीत आहेत. जिथे महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो, अशा प्रतिगामी विचारांना ते प्रोत्साहन देत आहेत.’’

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Civil suit against lyricist javed akhtar in thane court for comparing rss with taliban scsg
First published on: 28-09-2021 at 07:34 IST