कराड : कृष्णा- कोयना नद्यांच्या अपूर्व प्रीतिसंगमावर वसलेला कराडचा घाट परिसर पौराणिक व ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. ग्रामदेवता कृष्णामाई मंदिरालगत असलेल्या दगडी घाटावर पूर्वी तीन ऐतिहासिक बुरुज (मदतनीस बुरुज) अस्तित्वात होते. काळाच्या ओघात हे बुरुज गाळ, माती व वाळूने पूर्णपणे झाकले गेल्याने ते लोकांच्या नजरेआड झाले होते. मात्र, एका जागरूक नागरिकाच्या मागणीनुसार आता हे बुरुज पुन्हा उजेडात येत आहेत.
राज्य शासनाच्या सार्वजनिक तक्रार निवारण पोर्टलवर एका नागरिकाने या ऐतिहासिक बुरुजांची दुरवस्था व त्याच्या जतनासंदर्भात दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नोंदवली होती. त्याची दखल घेत शासनाने कराड नगरपालिका प्रशासनास कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार, सध्या कृष्णा घाटावरील सफाई व उत्खनन सुरू आहे.
शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी प्रीतिसंगमावरील कृष्णा घाटावर जेसीबीच्या साहाय्याने माती व वाळू हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. या कार्यवाहीत कृष्णामाई मंदिरालगतचे दोन बुरुज मधला व पूर्वेकडील बुरुज गाळमुक्त करून खुले करण्यात आले. तर तिसरा बुरुज सध्या नदीपात्रात उतरणाऱ्या डांबरी रस्त्याखाली दबला गेला असल्याचे दिसत आहे.
हे बुरुज पेशवेकालीन स्थापत्य कौशल्याची आणि प्रशासन व्यवस्थेची साक्ष देतात. त्यामुळे या बुरुजांचे जतन, संवर्धन गरजेचे असल्याचे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. लोकांसाठी हे एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे.
बुरुज सापडल्याने एकीकडे शहरवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असताना, उत्खननामुळे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचून लहान मुले, वृद्ध नागरिकांसाठी हा धोका असल्याने त्याअनुषंगाने बुरुजांच्या सुरक्षेसाठी कुंपण लावणे, माहिती फलक उभारणे गरजेचे आहे.
कृष्णा नदीच्या घाटावरील हे बुरुज खूप उंच होते. मात्र, नदीपात्र खोल असल्याने या बुरुजांवर पाय सोडून बसले, तरीही नदीपात्र खूप खोल वाटायचे. मुले नदीमध्ये पोहण्यासाठी याच बुरुजांवरून नदीत उड्या घेत असत. आज मात्र, पुराच्या पाण्यामुळे नदीमध्ये वाहून आलेला गाळ, माती आणि वाळूमुळे वाळवंटाची उंची वाढली आणि हे बुरुज पूर्णपणे बुजून केले होते. आता ते खुले झाल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.