CM Devendra Fadnavis on Gopichand Padalkar Statement: भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि वाद हे समीकरण तसे नवे नाही. पडळकर यांनी याआधी अनेकदा आपल्या विधानांनी वाद ओढवून घेतलेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली होती. त्यानंतर आता पडळकर यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जंयत पाटील यांच्या पालकांबाबत वादग्रस्त आणि अश्लाघ्य विधान केले असून त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचे वडील, दिवंगत नेते राजाराम बापू पाटील यांचा उल्लेख करत अश्लाघ्य विधान केले होते. या विधानानंतर सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून पडळकर यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. तसेच शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अजित पवारांनीही राजकीय संस्कृती जपायला हवी, असा टोला लगावला आहे.
माध्यमांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांचे विधान योग्य आहे, असे माझे मत नाही. कुणाच्याही वडील आणि कुटुंबाबाबत चुकीचे भाष्य करणे योग्य नाही. यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी बोलून त्यांना समज दिली आहे. शरद पवारांचाही यासंदर्भात मला फोन आला होता. या विधानाचे आम्ही समर्थन करत नाही, हे मी त्यांना सांगितले.”
“गोपीचंद पडळकर हे तरूण आणि आक्रमक नेते आहेत. अनेकदा आक्रमकता दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल, हे ते लक्षात घेत नाहीत. हे लक्षात ठेवून आक्रमकता दाखवली पाहिजे, असे त्यांना मी सांगितले. तुम्हाला भविष्यात चांगला नेता होण्याची मोठी संधी आहे. त्याच्यामुळे बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील, हे लक्षात ठेवा”, असा सल्ला आमदार पडळकर यांना दिला असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
गोपीचंद पडळकर यांचीही प्रतिक्रिया समोर
दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले विधान अयोग्य नसून त्यावर माफी मागणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच याबाबत शरद पवारांनी फडणवीसांना केलेल्या फोनवर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मातोश्रीवर जेव्हा विधान केले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला होता का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दलचा चुकीचा व्हिडीओ AI द्वारे तयार केला गेला. त्यावर पवारांनी मोदींना फोन केला का? असे प्रश्न पडळकर यांनी उपस्थित केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा मला फोन आला होता. यासंदर्भात त्यांनी मला काही सूचना दिल्या आहेत. त्या सूचनांचे मी पालन करेन, अशी सारवासारव यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.