CM Devendra Fadnavis Satara Doctor Suicide News: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे नेते आणि माजी खासदार रणजित निंबाळकर यांचा नामोल्लेख करत आरोप केले होते. मृत तरूणीने आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात साताऱ्यातील खासदार असा उल्लेख असल्याचे दानवे आणि इतर विरोधकांनी म्हटले होते. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्यातील फलटणच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी हा दौरा रद्द करावा, असा काही जणांनी प्रयत्न केल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनींच यावेळी केला. तसेच अंबादास दानवे यांनीही आज सकाळी एक्सवर पोस्ट टाकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ज्यांचे नाव आले, त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसणार असल्याचे म्हटले होते.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण आत्महत्या प्रकरणात थेट भाष्य केले. ते म्हणाले, आमच्या एका लहान बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्याचे कारणही तिने हातावर लिहून ठेवले. पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटकही केली. त्यातील जवळपास सर्व सत्य बाहेर येत आहे. कुठल्याही परिस्थितीत आमच्या लहान बहिणीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा निर्णय आम्ही घेतला आहे.

“अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचे, अशा प्रकारचा निंदनीय प्रयत्न होताना दिसला. काहीही कारण नसताना रणजीत नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांचे नाव घुसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहीत आहे. मला थोडीजरी शंका असती तर मी हा कार्यक्रम रद्द करून याठिकाणी आलो नसतो”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस पुढे म्हणाले, “अशा प्रकरणात मी पक्ष, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या लहान बहिणीचा विषय आहे, तिथे तडजोड करत नाही. पण प्रेताच्या टाळूवरचे लोणी खायचा कुणी प्रयत्न करत असेल, कुणी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर तेही मी सहन करणार नाही.”

अंबादास दानवे यांनी काय आरोप केला?

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत चुकीचा शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी वरिष्ठांचा दबाव तसेच खासदारांच्या दोन खासगी सचिवांकडून दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर, त्यांचे बंधू अभिजीत निंबाळकर, राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांच्यावर आरोप केले.