Devendra Fadnavis On Sugar Factory : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधक करत आहेत. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. यातच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत साखर कारखान्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन ५ रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केल्याचं पाहायला मिळालं.
तसेच काही साखर कारखान्यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान, याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत साखर कारखान्यांना मोठा इशारा दिला आहे. ते लोणी येथील कार्यक्रमात बोलत होते. ‘शेतकऱ्यांच्या मालात (ऊस) काटा मारणारे (वजनात फसवणूक) कारखाने मी शोधून काढले आहेत, त्या कारखान्यांना मी आता दाखवतो’, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“काही लोक छोट्या मनांचे झाले आहेत. काही दिवसापूर्वी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली, तेव्हा आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की, ३०,३० हजार कोटींचे व्यवहार होत आहेत.सरकार तुम्हाला १०, १० हजार कोटी देत आहे, तर मग तुमच्या नफ्यातून शेतकऱ्यांसाठी ५ रुपये बाजूला काढून ठेवा. आम्ही ते पैसे एफआरपीमधून मागितले नव्हते. एफआरपीमधील पैसे शेतकऱ्यांचे आहेत आणि नफ्यातील पैसे हे कारखान्यांचे आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“आपण विचार केला तर जवळपास २०० कारखाने आहेत. त्यामध्ये प्रत्येक एका कारखान्याला आपण २५ लाख रुपये शेतकऱ्यांना वेगळे काढून ठेवायला सांगितलं, तर काही लोकांनी मोठ्या प्रमाणात गजब उभा केला. ते म्हणाले की शेतकऱ्यांकडून तुम्ही पैसे वसूल करता? शेतकऱ्यांकडून नाही तर कारखान्यांच्या नफ्यातून मागितले होते. जो शेतकरी तुमच्याकडे शेतमाल टाकतो, शेतकरी शेतात राबतो, त्या शेतकऱ्यांवर आपत्ती आली आणि तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितलं तर तुम्ही मागेपुढे पाहता?”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत. त्या साखर काऱखान्यात शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारला (वजनामध्ये फसवणूक) जातो, त्या कारखान्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्यांचा काटा मारून मारून पैसे जमा करता आणि शेतकऱ्यांसाठी २५ लाख मागितले तर तुमची ते देण्याची दानत नाही. तुम्ही या कारखान्यांचे मालक नाहीत, तर आमचा शेतकरी या कारखान्यांचे मालक आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम सरकार करेल”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.