मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. या योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या योजनेतील भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश करणार असल्याचा निर्धार पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. या योजनेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचा इशारा संजय पवार यांनी दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मार्चात बैलगाडीमध्ये देखावा उभारण्यात आला होता. त्यात शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दाखवण्यात आले होते.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी इंद्रजीत देशमुख यांचा योजनेबाबतचा अहवाल खुला करण्यात यावा, तसेच दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे करण्यात आली. या प्रकरणात बडे मासे गळाला लागतील, असा दावा शिवसेनेने केला आहे. या प्रकरणात अधिकारी पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची दिशाभूल करत असल्याचा दावा पवार यांनी केला आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी पैशांचे आमिष दाखवण्यात येत आहे. त्याचे रिकॉर्डिंगही करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी
बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशाराही पवार यांनी दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सुभेदार यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis jalyukt shivar yojana scam kolhapur shivsena protest on collector office
First published on: 30-05-2017 at 14:08 IST