CM Devendra Fadnavis on Ambadas Danve allegations : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याच्या काळात सुरू करण्यात आलेल्या योजना बंद केल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. शिवसेनेचे (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर अशा आठ योजनांची यादीच जाहीर केली आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. आपण कोणतीही योजना बंद केली नसल्याचे फडणीस म्हणाले आहेत.
अंबादास दानवे यांनी केलेल्या दाव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,”अंबादास दानवे यांना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक ट्वीट करण्याची इच्छा झाली, हे देखील महत्त्वाचं आहे. पण त्यांच्यासहित मी सर्वांना सांगतो की कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही. मी सगळ्या योजना चालवणार आहे. कुठलीच योजना आम्ही बंद करणार नाही.”
“एखाद दुसरी योजना काही काळासाठी डेफर (स्थगित) होऊ शकते, कारण आता आमच्यावर या संकटामुळे मोठा भार पडलेला आहे. पण आता तरी कुठलीच योजना आम्ही डेफर (स्थगित) देखील केलेली नाही. त्यामुळे मला असं वाटत नाही की कुठली योजना बंद होईल,” असे फडणवीस म्हणाले.
“ज्या आमच्या प्लॅगशीप योजना आहेत, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना वीज माफीची योजना असेल, यातील आमची कुठलीच योजना बंद होणार नाही,” असेही फडणीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
दानवे काय म्हणाले होते?
दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत फडणवीस सरकारवर आरोप केला होता. “सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले ‘कटप्रमुख’ मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील.. शिंदेंच्या या योजना बंद..
१. आनंदाचा शिधा- बंद!
२. माझी सुंदर शाळा – बंद!
३. १ रुपयात पीकविमा – बंद!
४. स्वच्छता मॉनिटर – बंद!
५. १ राज्य १ गणवेश – बंद!
६. लाडक्या भावाला अपरेंटीसशिप – बंद!
७. योजनादूत योजना – बंद!
८. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – बंद!
योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू.”
राज ठाकरे मविआत गेल्यावर महायुतीला फटका?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता आहे, तशा त्यांच्यात चर्चा देखील सुरू आहेत. ते महाविकास आघाडीत गेले तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही. पण एवढं निश्चितपणे सांगतो की कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि महायुती हेच या निवडणुका जिंकणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल हा मला विश्वास आहे”.