Jai Gujarat Slogan by Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून चांगलाच वाद सुरु आहे. असं असतानाच आज (४ जुलै) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना जय गुजरात अशी घोषणा दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा ‘जय गुजरात’ ही घोषणा दिली तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. शिंदेंच्या या घोषणेनंतर विरोधक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत.

यानंतर यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलेल्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर स्पष्टीकरण देत कारण सांगितलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या घोषणेबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांच्याही एका काही दिवसांपूर्वीच्या घोषणेचा दाखला दिला. तसेच आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो, त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर ‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मराठी आणि महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं असं होत नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना ‘जय गुजरात’ असा नारा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी आपल्याला आठवण करून देतो की याआधी एकदा चिकोडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना शरद पवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘जय कर्नाटक’ अशी घोषणा दिली होती. मग मग त्याचा अर्थ असा घ्यायचा का की त्यांचं कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही, असं समजायचं का?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो, त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर ‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गुजरातवर जास्त प्रेम आणि मराठी व महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? एवढा संकुचित विचार मराठी माणसांना शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसांनी अटकेपार झेंडा फडकवलेला आहे. याच मराठी माणसांनी संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेलं आहे. संपूर्ण भारतातील मोगली सत्ता घालवण्याची आणि दिल्लीवर भगवा झेंडा फडकावण्याचं काम मराठी माणसांनी केलं. मग एवढा संकुचित विचार जर कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले होते?

एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांची स्तृती करत एक शेर ऐकून दाखवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है,
दुश्मन क्या चीज है, तुफान भी अपना रुख बदल देता है
आपके आनेसे यहाँ की हवा का नूर बदल जाता है,
आपके नाम से हर शख्स अदब से झुक जाता है”
हा शेर सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा दिली.