CM Devendra Fadnavis on Manikrao Kokate removed from agriculture portfolio : महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनावेळी सभागृहात माणिकराव कोकाटे मोबाइलवर ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कथित व्हिडीओ समोर आला होता. यानंतर सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करण्यात आली, याबरोबरच कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांनी लावून धरली. माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखातं काढण्यात आलं असून दत्तात्रय भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषीखातं देण्यात आलं आहे. या खातेबदलाच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
खातेबदलाच्या निर्णयावर बोलताना फडणवीस म्हणाले की “जी काही घटना घडली त्यानंतर मोठा रोष होता, त्याबद्दल अजित पवार आणि एकनाथ शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे. त्यांचं खातं बदलेलं आहे आणि त्यांना दुसरं खातं दिलं आहे. कृषी खातं मामा भरणे यांना दिलं आहे.” या बदालसह अजून मंत्रिमंडळात काही बदल होतील का? याबद्दल विचारले असता फडणवीस यांनी “आत्तातरी दुसरा कुठला बदल होईल अशी चर्चा नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत का? याबद्दल फडणवीस म्हणाले की, “हे नक्की आहे की, आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तवणूक करेल, तर त्यांना सगळ्यांना आम्ही तिघांनी सांगितलं आहे की ते खपवून घेतलं जाणार नाही आणि त्यावर कारवाई होईल.” इतर मंत्र्यांना हा इशारा आहे का? याबद्दल फडणवीस म्हणाले की, “हा सर्वांनाच इशारा आहे. आम्ही जनतेच्या सेवेसाठी आलो आहोत. आणि जनतेची सेवा करताना आपण काय बोलतो, काय करतो, आपलं वर्तन कसे आहे हे सगळं लोक पाहातात, त्यामुळे यावर नियंत्रण असलेच पाहिजे.”
धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतणार का?
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाते नेते धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतल्याने ते मंत्रिमंडळात परतू शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “त्यांनी तीन वेळा माझी भेट घेतली आहे. वेगवेगळ्या कारणांनी भेट घेतली आहे. कुठल्याही भेटीत मंत्रिमंडळाबाबत चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही. मंत्रिमंडळाची चर्चा ही मी, अजितदाद आणि एकनाथ शिंदे करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.