CM devendra fadnavis reaction thanked Uddhav thackeray over dasara melava speech मुंबईतील शिवाजी पार्क येथे काल (गुरुवार) ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळावा पार पडला. पाऊस कोसळत असतानाही उद्धव ठाकरे यांनी जवळपास तासभर जोरदार भाषण केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपाचा आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केला. दरम्यान या भाषणानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणीस नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की, “मी उद्धव ठाकरेंचे आभार मानेल, की उद्धव ठाकरेंनी माझे १ हजार रुपये वाचवले. कारण मी आव्हान दिलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातील एक मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा. काल मी भाषण ऐकलं नाही पण भाषण संपल्याबरोबर भाषण ऐकणाऱ्यांना विचारलं की मला हजार रुपयांचा फटका आहे का? उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का? अख्खा भाषणात विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत. ते बोलूच शकत नाहीत,” अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“ते अद्वातद्वा बोलतात. खरंतर त्यांचं बोलणं स्वगत असतं, कारण यावर्षी पुढे (मेळाव्यात) माणसंही नव्हती. तरीही त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात अवाक्षरही न काढता, मी जे बोललो ते सत्य करून दाखवलं आणि माझे हजार रुपये वाचवले त्याबद्दल आभार,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचा मुंबईत विजय संकल्प मेळावा पार पडला होता, या मेळाव्यात बोलताना फडणवीसांनी याबद्दलचे आवाहन केले होते. फडणीस म्हणाले होते की, “आज तुम्ही यांची (उद्धव ठाकरे) भाषणं पाहा. काय बोलतात? यांच्या भाषणांमध्ये, मी तर तुम्हाला १०० रुपये द्यायला तयार आहे. तुम्ही त्यांची (उद्धव ठाकरे) मागची १० भाषणं काढा आणि त्यामध्ये विकासावर एक वाक्य दाखवा. मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी विकासाच्या व्हिजनचं एक वाक्य तुम्ही मला दाखवा आणि माझ्याकडून १०० रुपये घेऊन जा. ते विकासावर बोलत नाहीत आणि बोलूही शकत नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ठाकरेंची भाजपावर सडकून टीका

दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईल की नाही याबाबत शंका व्यक्त करीत भाजप आणि शिंदे गटाने मुंबईचा विचका केल्याचा आरोप केला. मुंबईत भाजपाच महापौर झाला पाहिजे, असे अमित शहा वारंवार सांगत आहेत. त्यासाठी भाजपने मुंबईत हिंदू- मुस्लीम अशी विभागणी सुरू केली आहे. भाजपचा हा डाव यशस्वी होणार नाही. मुंबईत आजही रस्त्त्यांवर खड्डे कायम आहेत. नागरी सुविधांच्या नावे बोंब आहे. मग गेल्या अडीच तीन वर्षांत मुंबईत केले तरी काय, असा सवाल ठाकरे यांनी केला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मग कर्जमाफी का केली जात नाही? २०१७ मध्ये फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी अजूनही पूर्ण झालेली नाही. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले आणि त्याची पूर्तती केली होती. भाजपवाले नुसत्याच घोषणा करतात, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.