Devendra Fadnavis On Pranjal Khewalkar Rave Party : पुण्यातील खराडीमधील एका सोसायटीत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर आज पुणे पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कथित रेव्ह पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या गुन्हे शाखेने टाकलेल्या या छाप्यात कोकेन, गांजा यासह इतर अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात रेव्ह पार्टीच्या संदर्भातील अशा प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी घडला आहे. मात्र, मी कार्यक्रमात असल्याने अद्याप अधिकृत आणि सविस्तर माहिती घेतलेली नसल्यामुळे मी माहिती घेतल्यानंतर सविस्तर बोलेन, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“पुण्यातील रेव्ह पार्टीच्या घटनेबाबत मी माध्यमांत बातम्या पाहिल्या आहेत. मी सकाळपासून कार्यक्रमात आहे. कार्यक्रमात असल्यामुळे मला त्या घटनेसंदर्भात अद्याप अधिकृत माहिती घेता आली नाही. मात्र, माध्यमांमधून जी काही माहिती समोर आली आहे, त्यानुसार पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकत कारवाई केली आहे. त्या कारवाईत काही ड्रग्स वगैरे आढळून आलेले आहेत. या घटनेची मी जेव्हा अधिकृत माहिती घेईल, तेव्हा सविस्तर बोलू शकेन. पण प्राथमिक माहितीनुसार अशा प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी घडला आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“पुण्यातील रेव्ह पार्टीची जी काही घटना घडली आहे, त्या घटनेचा तपास कायद्याने आणि नियमाने पुण्याचे सीपी करत आहेत. जे त्या ठिकाणी सापडलेले आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेत कोणीही चुकीचं वागायचं नसतं आणि कोणीही चुकीचं काही करायचं नसतं”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसेंनी काय प्रतिक्रिया दिली?
प्रांजल खेवलकर यांना कथित रेव्ह पार्टीत सहभाग असल्याबाबत पुण्यातून अटक करण्यात आली. त्यानंतर एकनाथ खडसे प्रतिक्रिया देताना म्हणाले, “गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू होतं, त्यावरून असं काहीतरी घडू शकतं याचा अंदाज मला येत होता. पुण्यामध्ये जी घटना घडली, ते मी चॅनेलच्या माध्यमातून पाहिल. माझं त्यांच्याशी (प्रांजल खेवलकर) बोलणं झालेलं नाही. ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत. जर पुण्यात घडलेली घटना खरोखर रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई त्यात असतील तर मी त्या गोष्टीचे समर्थन कधीही करणार नाही.”
“पोलीस यंत्रणेने खरोखर चांगल्या पद्धतीने तपास करायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी असे होते की, पोलीस यंत्रणा तपास व्यवस्थित करत नाही. अशी जनमानसामध्ये प्रतिमा आहे. जर या प्रकरणामध्ये तथ्य असेल तर जावई असो किंवा कुणीही असो त्याचे समर्थन कधी करणार नाही. परंतु जर जाणूनबुजून अडकविण्याचा प्रयत्न केला असेल तर तेही सहन केले जाणार नाही”, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.