मोठ्या टेकात ते म्हणतात, दाढीला पकडून, खेचून आणले असते. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात ज्यांना वर्षा निवासस्थानाची साधी माडी उतरता आली नाही, ते दाढीपर्यंत कसे पोहोचतील? तुमच्या अहंकाराची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना फटकारले.
धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे आयोजित करण्यात आलेल्या मिशन-४८ शिवसंकल्प – कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रवींद्र गायकवाड, मराठवाडा विभागीय अध्यक्ष आनंदराज जाधव, सोलापूर संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, लातूर जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली येथील जाहीर सभेत उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला होता. मिंद्यांची दाढी पकडून आणले नसते का? मात्र जे सडलेले आहेत, तेवढ्यांना जाऊ दिले, अशा शब्दांत ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला होता. धाराशिव येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी तोच धागा पकडत उध्दव ठाकरे यांना शेलक्या शब्दांत प्रतिउत्तर दिले. या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत, हे विसरू नका. मला बोलायला भाग पाडू नका, माझा नाद करू नका, मला हलक्यात घेऊ नका. तुम्ही हलक्यात घेतले. मात्र त्यामुळे दोन वर्षांपूर्वी काय घडले? ते सगळ्या जगाने पाहिलेले आहे. त्यात माझा काहीही स्वार्थ नव्हता, अशी पुष्टीही मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना जोडली.
हेही वाचा >>> Breaking: अखेर शरद पवार गटाला नाव मिळालं, ‘या’ नावावर निवडणूक आयोगाचं शिक्कामोर्तब!
मागील विधानसभा निवडणुकीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून तुम्ही वागलात. त्यामुळे शिवसेना वाचविण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भाळी आलेला बेईमानीचा शिक्का पुसण्यासाठी आम्ही धाडसी निर्णय घेतला. स्वतःला मर्द समजता, तर दररोज मर्द आहोत म्हणून सांगत कशाला सुटता? असे ओरडून सांगण्याची वेळ तुमच्यावर का येते? असे खोचक प्रश्नही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थित केले. तुम्ही कितीही आरोप करा, हा एकनाथ शिंदे कामाने उत्तर देईल. मुख्यमंत्री पदावर बसलो असलो तरी काल, आज आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करीत राहणार आहे. काम करणार्या महायुती सरकारला महाराष्ट्रातील जनता भरभरून आशीर्वाद देत आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणल्याखेरीज राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.