सांंगली : दिल्ली बैठकीचे बोलावणे आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इस्लामपूरमध्ये शुक्रवारी झालेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अवघ्या ३४ मिनिटांत आटोपला. अवघ्या तीन मिनिटांत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व मदतीचे धनादेश स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर बोलावून औपचारिकता पूर्ण करण्यात आली. आणि या कार्यक्रमासाठी गेल्या आठ दिवसांपासून राबणाऱ्या सरकारी यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला.
महायुतीच्या जागा वाटपात हातकणंगले मतदारसंघावर शिवसेनेने हक्क सांगत विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत इस्लामपूरला शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी लाभार्थींची गर्दी जमविण्यासाठी शासन यंत्रणा गेल्या आठ दिवसांपासून प्रयत्नशील होती. प्रशासकीय पातळीवरून लाभार्थ्यांना संपर्क साधून तुमच्यासाठी जाण्यायेण्यासाठी बसची सुविधा व जेवण यांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगत जास्तीत जास्त गर्दी कशी होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले होते. वाळवा, शिराळा या तालुक्यातील गावातून लाभार्थींना नेण्यासाठी २६९ बसची व्यवस्था करण्यात आली होती.
हेही वाचा – उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेऊन उद्योग पळाल्याचा आरोप, मुख्यमंत्री शिंदेंची मविआवर टीका
हेही वाचा – प्रफुल्ल पटेलांच्याही भरपूर कुंडल्या माझ्याकडे…. नाना पटोले गुपित उघड करणार…?
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे होते. अध्यक्ष शेवटी बोलतात हा सभेचा प्रघात मोडून त्यांना पहिल्यांदा बोलण्यास सांगण्यात आले. तसे त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगून हा प्रघात मोडल्याची कबुलीही दिली. तर खासदार माने यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत असताना प्रचारकीचे भाषण करत काही अवधी घेतला. यानंतर एकूण ३४ मिनिंटाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी २२ मिनिटे भाषण करत आटोपते घेतले आणि तातडीने बैठकीसाठी दिल्लीला प्रस्थान केले.