करोना रुग्णसंख्या घटल्याने र्निबध शिथिल करण्यासाठी जनमताचा दबाव आणि लशीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाला मुभा देण्याबाबत विचार करण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर अखेर १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासास परवानगी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील माहिती सायंकाळी आठ वाजता सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना दिली. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्ह करताना त्यांच्या मागे ठेवलेल्या झेंड्यांवरुन नवीन वाद निर्माण झालाय.  पुण्यामधील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भातील एक पोस्ट केली असून ती सध्या चर्चेत आहे.

सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या लाइव्ह भाषणामधील स्क्रीनशॉट शेअर करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वजासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे. “भारताच्या तिरंगा झेंड्याच्या वरच्या पातळीवर तसेच बरोबरीने इतर कोणताही झेंडा असू नये हा साधा नियम पाळावा अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती,” असं म्हणत सरोदे यांनी नाराजी व्यक्त केलीय.

नक्की वाचा >> जर्मनी : भारतीय महिलेने सादर केलेल्या करोना व्हॅक्सिन सर्टीफिकेटवरील मोदींचा फोटो पाहून अधिकारी संतापली अन्…

पुढे या पोस्टमध्ये सरोदे यांनी मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तीने इतर झेंडा घेऊन बसूच नये असंही म्हटलं आहे. ” खरे तर मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने इतर झेंडा घेऊन बसूच नये. दुर्दैव आहे भारतीय लोकशाहीचे की आज आपल्या देशात राष्ट्रध्वज केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला उत्सवी स्वरूपात मिळविण्याच्या कामाचे राहिले आहेत की काय असा प्रश्न पडतो. अनेकांसाठी त्यांचे राजकीय पक्षांचे ध्वज व धर्म ध्वजच महत्वाचे आहेत,” असा टोलाही सरोदे यांनी लगावला आहे.

इतर कोणातच ध्वज महत्वाचा नसलेले भारतीय नागरिकच या देशाला अखंड ठेवतील. लोकशाही अशाच नागरिकांच्या व नेत्यांच्या शोधात आहे. भारतीय ध्वज संहिता इंडियन फ्लॅग कोड सगळ्यांनी वाचवा तसेच याबाबतच्या नियमांची माहिती घ्यावी”, असं आवाहनही सरोदे यांनी केलंय.


सरोदे यांच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया त्यांच्या फॉलोअर्सने नोंदवल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, उपाहारगृहे, धार्मिकस्थळे आणि मॉल्सबाबतही लवकरच निर्णय घेण्याचे सोशल नेटवर्किंगवरुन राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेशातील लाखो नोकरदारांना दिलासा दिला. रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत जनमताचा रेटा वाढला होता. रेल्वे सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली होती. या पाश्र्वभूमीवर स्वातंत्र्यादिनापासून सर्वसामान्यांना रेल्वेसेवेची मुभा मिळणार आहे. मुंबईतील १९ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. रेल्वेसेवेसाठी राज्य सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपवर किं वा शहरातील महापालिकांच्या कार्यालयातून क्यूआर कोड मिळविणे आवश्यक असेल. अ‍ॅपवर लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतरच परवानगी पत्र मिळेल. क्यूआर कोड दाखवल्यावरच रेल्वे तिकीट खिडकीवर मासिक पास अथवा दैनंदिन तिकीट मिळू शके ल. गेल्या एप्रिलपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली रेल्वेसेवा जवळपास चार महिन्यांनी पुन्हा सुरू होत आहे.