राज्यात शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटून आता अडीच वर्षांहून जास्त काळ लोटला आहे. तेवढाच काळ राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हायला देखील झाला आहे. या काळामध्ये या दोन्ही पक्षांनी तुटलेली युती आणि त्यामागची कारणं यासंदर्भात एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले आहेत. यासंदर्भात अनेकदा हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार असल्याच्या वदंता देखील या दोघांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसत्ताच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावरून भाजपाला खरमरीत सवाल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येतील?

या कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी शिवसेना-भाजपा राज्यात पुन्हा एकत्र येतील का? अशी विचारणा केली असता त्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका करणारं उत्तर दिलं. “आधी ते ज्या पद्धतीने चालले आहेत, ते सुधारणार आहेत का? हा प्रश्न आहे. सुरुवातीच्या काळात आमची युती वैचारिक पातळीवर झाली होती. पण आता वैचारिक पातळी कुठे पाताळात गेलीये की काय तेच कळत नाही. कुणाबरोबरही युती करायची असं चाललंय. याबाबत मग त्यांचाच कित्ता आम्ही गिरवला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मंत्रालयात कधीपासून काम सुरू करणार? अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं खोचक उत्तर; म्हणाले, “मी पुन्हा येईन सांगून…”!

“सत्ताप्राप्ती हे आमचं स्वप्नच नव्हतं!”

दरम्यान, सत्ताप्राप्ती हे आमचं स्वप्नच नव्हतं, असं उद्धव ठाकरे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले. “आमचं सत्ताप्राप्ती हे स्वप्नच नव्हतं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करायचं. पण नंतर लक्षात आलं की त्यासाठी राजकारणात यावं लागेल”, असं ते म्हणाले.

CM Uddhav Thackeray : पुन्हा भाजपासोबत युती होणार का? उद्धव ठाकरे म्हणतात…

युती झाली तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते….

“युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही देश सांभाळा, राज्य आम्ही सांभाळतो. आता देशही तुम्ही जिंकलात, राज्यही तुम्ही जिंकलात, महापालिकाही तुम्हालाच पाहिजे, ग्रामपंचात, स्थानिक निवडणुका सगळंच तुम्हाला पाहिजे. मग आम्ही धुणीभांडी करायची का? धुणीभांडी करायला बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली नव्हती. धुणीभांडी करणाऱ्या मराठी माणसाला ताठ मानेनं उभं राहाता यावं, यासाठी शिवसेनेची स्थापना झाली”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“…म्हणून केंद्र-राज्य संघर्ष उभा राहिला”

“सत्ता कुणाला नको असते? रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू झालं आहे. ज्याप्रमाणे ही आक्रमणं होत आहेत. सत्ता मिळवा, पण तीसुद्धा आपल्याकडे लोकशाही आहे हे न विसरता प्रामाणिकपणे लोकांसमोर जाउन लोकांनी सत्ता दिली तर तुम्ही राज्य करा. पण आता सगळं मला हवंच, मतं नाही मिळाली तरी सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळवीनच हा प्रकार देशाच्या राजकारणात नव्हता. त्यानी हे देशाचं राजकारण नासवून टाकलं आहे. विकृत करून टाकलं आहे. त्यातूनच देशात राज्य आणि केंद्र संघर्ष सुरू झाला आहे. हा सत्तापिपासूपणा आहे. केंद्रात बसलोय म्हणून राज्याची मुस्कटदाबी करायची या प्रवृत्तीचा सगळ्यांनी निषेध करायला हवा”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray targets bjp on alliance rejects possibility of coming together again pmw
First published on: 25-02-2022 at 20:23 IST