पालघरमध्ये घडलेली घटना लांछनास्पद आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  गेल्या पाच वर्षातही आपल्या राज्यात मॉब लिंचिंग झालं. मुळात जिथे घडलं तो भाग पालघरपासून ११० किमी अंतरावर आहे. दोन साधू दुर्गम भागातून जात होते सरळ मार्गाने जाता येत नाही. हे काहीही घडवून आणण्यात आलेले नाही. जे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे तिथे काही मीटरवर दादरा नगर हवेली म्हणजे केंद्रशासित प्रदेशाची हद्द सुरु होते. तिथे त्यांना अडवलं गेलं, त्यानंतर त्यांना परत पाठवलं गेलं. तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. दादरा नगर हवेलीतही त्यांना प्रवेश नाकारला गेला आणि त्यांना परत पाठवलं गेलं. त्या परिसरात गेले काही दिवस अशी अफवा आहे तिथे चोर फिरत आहेत. त्या सगळ्या गैरसमजातून हा प्रकार घडला.  असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- पालघरमधील हल्ल्याला धार्मिक रंग चढवू नका : मुख्यमंत्री

ही घटना रात्री जेव्हा घडली तेव्हा एवढ्या रात्री पोलीस पोहचले. पहाटे पाच्या सुमारास पोलिसांनी आरोपींना पकडलं. आम्ही कारवाई केलेली आहे या प्रकरणावरुन राजकारण नको असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. जे लोक धर्माचं राजकारण करु पाहात आहेत त्यांनी ते करु नये. मी या घटनेत जात-पात-धर्म पाहिलेला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. पालघर प्रकरणात १०० पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. यामध्ये नऊ मुलं अल्पवयीन आहेत त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणातल्या पाच म्होरक्यांनाही अटक केली आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- पालघर प्रकरणी सोशल मीडियावरुन आगी लावणाऱ्यांना शोधून काढणार – उद्धव ठाकरे

रुतलेलं अर्थचक्र हळूहळू बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउन संपलेला नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. गर्दी वाढली, सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही तर पुन्हा बंधनं टाकावी लागतील. आज महाराष्ट्रात पहिला रुग्ण सापडून सहा आठवडे पूर्ण झाले आहेत. या सहा आठवड्यांमध्ये आपण संयमाने घरात बसला आहात. मात्र या सगळ्या दिवसांमध्ये पोलीस, आरोग्य सेवेतील कर्मचारी, स्वच्छता विभागातील कर्मचारी हे सातत्याने काम करत आहेत हे आपले लढवय्ये आहेत.