कंगनाविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार; २४ तासांत अहवाल सादर करण्याचे गृहमंत्र्यांना आदेश

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ट्विटरद्वारे माहिती

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर अध्यक्षांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना याबाबत २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

सरनाईक म्हणाले, ‘मुंबईची पाकव्याप्त काश्मीर व तालिबानशी तुलना करून बेछूट आरोप करणाऱ्या कंगनावर योग्य ती कारवाई करण्याची लेखी विनंती मी आज विधानसभा अध्यक्षांना केली. त्यांनी गृहमंत्र्यांना याची तातडीने चौकशी करून २४ तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.”

सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, “अभिनेत्री कंगना रणौत यांनी मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मिरशी केलेली असून मुंबई पोलिसांवर माझा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे मुंबईत राहणे धोक्याचे आहे अशा पद्धतीचे ट्विट केले होते. त्याचबरोबर काही लोकांच्या प्रतिक्रियेनंतर परत मुंबईची तुलना तालिबानबरोबर करण्याबाबतही टि्वट केले होते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये व प्रामुख्याने मुंबईमध्ये विविध राजकीय नेत्यांनी, समाजसेवकांनी आपली प्रतिक्रिया देऊन कंगना राणौत यांच्यावर कारवाईची मागणी केली होती, परंतू अद्यापपपर्यंत कंगना राणौत यांच्यावर कायदेशीर कारवाई झालेली नाही.”

“कंगनाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ट्विट करुन अनेक कलाकारांवर अंमलीपदार्थ सेवनप्रकरणी आरोप केलेले आहेत. तसेच काही कलाकारांनी देखील कंगना यांच्यावर अंमली पदार्थ सेवनाचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे या सभागृहातील सर्व सदस्यांनी या घटनेची तीव्र निंदा करुन सर्वानुमते कंगना राणावत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव पारीत करावा”, असे सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Complaint against kangana ranaut to assembly speaker of maharashtra hm ordered to submit report within 24 hours aau

ताज्या बातम्या