भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यासह नगरसेवक धनराज घोगरे (वानवडी जि.पुणे) यांच्या विरुध्द शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अ‍ॅड.संगिता चव्हाण, कृष्णा राठोड यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पूजा चव्हाण हिचे अशोभनिय छायाचित्र, संभाषण   प्रसारीत करुन तिच्यासह कुटुंबीयांची व बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा असे तक्रारीत म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाण हिने पुणे येथे आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ, नगरसेवक धनराज घोगरे यांनी पिडीतेचे चारित्र्यहनन करुन, बंजारा समाजाची नाहक बदनामी केल्याची तक्रार बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अ‍ॅड.संगिता चव्हाण व कृष्णा राठोड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करुन भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार विवक्षित अपराधांना बळी पडलेल्या व्यक्ती कोण ते उघड करू नये, असे असताना देखील भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी माध्यमांमध्ये पिडीतेचे नाव व जातीचा वारंवार उल्लेख करुन बदनामी केली आहे. राज्यात ठिकठिकाणी प्रसारमाध्यमात बोलताना पिडीत युवती गर्भवती होती, तिचा गर्भपात करण्यात आला असे वारंवार सांगितले. सदरील माहिती प्रसारीत करुन त्यांनी पिडीतेच्या कुटुंबियांची बदनामी केली. कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पुणे येथील पिडीतेच्या बंद सदनिकेत घुसून मौल्यवान वस्तू, लॅपटॉप व भ्रमणध्वनी चोरुन त्यामधील संभाषण व अन्य चित्रफितींशी छेडछाड करुन ती समाजमाध्यमातून जाणीवपूर्वक प्रसारीत केली. राजकीय पोळी भाजण्याच्या उद्देशाने व समाज बांधवांची दिशाभूल करुन जाणीवपूर्वक बदनाम केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ, नगरसेवक धनराज घोगरे यांनी राज्यघटना, सर्वोच्च न्यायालय व कायद्यांची पायमल्ली केली असल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन पिडीतेच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी तक्रारीत केली आहे.