कर्जतः शहरातील पुरातन हनुमान मंदिर व मल्लिकार्जुन मंदिर परिसरात झालेले अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी ‘अखंड हिंदू समाज’च्या वतीने आज, शुक्रवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच आमदार संग्राम जगताप व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दिवसभर तणावाचे वातावरण होते. मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात होता. या वेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, ‘आता हा देश पूर्वीचा राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झाला आहे, ही बाब जिहादींनी लक्षात घ्यावी, त्यांच्या लक्षात येत नसेल, तर पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ पुन्हा एकदा पाहावेत. अतिक्रमण काढले नाही तर नगरपंचायत व महसूल प्रशासनाला किंमत मोजावी लागेल. ज्या गटाच्या बोगस नोंदी झाल्या आहेत, त्या रद्द करा.
हिंदू मंदिरांच्या परिसरात पावित्र्य राखले जात नसेल तर तेथे राहण्याचा कोणालाही अधिकार नाही. जिल्ह्यात वेगवेगळे जिहाद सुरू आहेत, तरुणांनी यापुढे काळजी घ्यावी व कोणत्याही जिहादीला सोडू नका. ’आमदार संग्राम जगताप म्हणाले, ‘आमच्या मंदिर परिसराचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. हनुमान मंदिर व इतर मंदिर परिसरात इतर धर्मीयांनी केलेले अतिक्रमण काढा.
प्रश्न फक्त कर्जतचा नाही, जिल्ह्यात अशा पद्धतीने इतर ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. ते सहन केले जाणार नाहीत. प्रशासनाने अतिक्रमण काढले नाही, तर पुन्हा कर्जतमध्ये येऊन आमच्या पद्धतीने अतिक्रमण काढू. होणाऱ्या परिणामास नगरपंचायत व प्रशासन जबाबदार राहील. भगव्या झेंड्याखाली योग्य उत्तर तत्काळ दिले जाईल.
लेखी आश्वासन
रास्ता रोको आंदोलन सुमारे तीन तासांहून अधिक काळ चालले. अतिक्रमण काढण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे लेखी पत्र तहसीलदार गुरू बिराजदार यांनी आमदार जगताप यांना दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.