गेल्या काही दिवसांपासून शहराला होत असलेल्या दूषित व अनियमित पाणीपुरवठय़ाचे वादळी पडसाद शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत उमटले. या प्रश्नावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत पाणीपुरवठय़ामध्ये सुधारणा होण्याची एकमुखी मागणी केली. बांधकामासाठी पैसे घेऊन अनियमित परवानगी प्रशासन देत असल्याचा आरोप शारंगधर देशमुख यांनी केल्याने त्यावरून आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी व त्यांच्यात शाब्दिक खडाजंगी उडाली. पाणीप्रश्नाबाबत अधिकाऱ्यांकडून गोलमाल उत्तर मिळू लागल्याने श्रीकांत बनछोडे, आदिल फरास, महेश सावंत या नगरसेवकांनी सभात्याग केला.
उपमहापौर मोहन गोंजारे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू झाले. प्रारंभी चंद्रकांत घाटगे यांनी प्रभाग क्र. ८ येथे असलेल्या पाण्याच्या टाकीच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. टाकीचा डोम कोसळला असतानाही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याबद्दल त्यांनी संताप्त व्यक्त केला. जलअभियंता मनीष पवार यांनी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी कंत्राटदारांना बोलावले असल्याचे नमूद करून चार दिवसांत पाण्याची पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे स्पष्ट केले. त्यावर नगरसेवक राजेश लाटकर यांनी या संदर्भात प्रभागात जनजागृती करण्याची गरज व्यक्त करून केवळ नगरसेवकांकडे बोट दाखवून प्रशासनाने अंग काढून घेऊ नये असे मत मांडले. पाण्याच्या टाकीबाबत इतकी दुरवस्था झाली असताना प्रशासन काय करीत होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बाराइमाम परिसरात दूषित पाणीपुरवठा सुरू असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नमूद करून आदिल फरास यांनी अशा परिस्थितीत नगरसेवकांनी काय करावे अशी विचारणा केली. प्रशासनाला लाज वाटत नाही का, असा टोला लगावत त्यांनी आजच्या सभेत पाणीप्रश्न निकालात काढावा, अशी मागणी केली. पर्यायी सोय म्हणून प्रभागात तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, असेही त्यांनी सूचित केले. पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन नसल्याने केंद्राकडून आलेले ४.२५ कोटी रुपयांचे पाइपलाइनचे अनुदान वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली. शहरात सर्वच ठिकाणी मैलामिश्रित पाणीपुरवठा होत असताना प्रशासन नगरसेवकांना दाद देत नसल्याचे सदस्यांनी सभागृहात सांगितले. अधिकाऱ्यांमध्ये संपर्काचा अभाव असल्याने हा प्रकार राजरोसपणे घडत असल्याचे लाटकर यांनी नमूद केले. याच एका कारणामुळे शहरातील विकासकामे रखडली असल्याचा आरोप त्यांनी केला. अधिकारीच वरचष्मा गाजवणार असतील तर सभेचे कामकाज बंद करून संपूर्ण शहर आयुक्तांनी चालवावे असे आव्हानही त्यांनी दिले. सत्ताधारी गटाकडून काहीच कामे होत नसल्याचा आरोप शिवसेनेचे महेश कदम यांनी केला. त्यावर राजेश लाटकर, आदिल फरास, शारंगधर देशमुख यांनी आरोप तथ्यहीन असल्याचे नमूद केले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2014 रोजी प्रकाशित
दूषित, अनियमित पाणीपुरवठय़ाबद्दल कोल्हापूर महापालिका सभेत गोंधळ
गेल्या काही दिवसांपासून शहराला होत असलेल्या दूषित व अनियमित पाणीपुरवठय़ाचे वादळी पडसाद शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत उमटले. या प्रश्नावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत पाणीपुरवठय़ामध्ये सुधारणा होण्याची एकमुखी मागणी केली.
First published on: 20-04-2014 at 04:00 IST
TOPICSगोंधळ
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion in kolhapur municipal meeting about contaminated irregular water supply