समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ( ४ नोव्हेंबर ) समृद्धी महामार्गावर गाडीने प्रवास केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. पण, फडणवीसांनी चालवलेल्या गाडीवरून आता काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एकत्र नागपूर ते शिर्डी असा प्रवास केला. देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास १५० किमीच्या वेगाने ही गाडी चालवली. त्यामुळे त्यांनी नागपूर ते शिर्डी हे ५२९ किलोमीटरचे अंतर अवघ्या पाच तासात पार केलं. दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्र्यांचा ताफा शिर्डीकडे निघाला होता. सायंकाळी पाच ते सव्वापाच वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा शिर्डीत पोहचला.

हेही वाचा : “पवनराजेंच्या मुलाशी ‘सामना’ झाला अन् आगीशी…”, निंबाळकरांनी पाटलांना डिवचलं; म्हणाले, “कधीही भिडायला तयार”

पण, उपमुख्यमंत्र्यांनी गाडी चालवतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ही गाडी आहे, मर्सडिज बेंझ जी-३५०डी. या गाडीवरून आता काँग्रेसने थेट शिंदे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने एक ट्वीट करत फोटो शेअर केले आहेत. त्यावर लिहलं की, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बिल्डरची गाडी चालवतायत. मग आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का?,” असा सवाल काँग्रसने उपस्थित केला आहे. याला अद्याप भाजपाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यात आलं नाही.

हेही वाचा : “मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास…”, गुलाबराव पाटील संतप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तत्कालीन भाजपा-शिवसेना सरकारच्या काळात समृद्धी महामार्गासाठी जमीन हस्तांतरीत करण्यात आली होती. नंतर महाविकास आघाडी सरकार आल्यावर या महामार्गाचे काम पुढे गेलं. महाविकास आघाडीकडून समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होण्याची शक्यता होती. पण, एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि ठाकरे सरकार सत्तेवरून पायउतार झालं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना पुन्हा आपल्या कार्यकाळात महामार्गाचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली आहे.