लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची चाहूल लागताच मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी महायुती सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील त्याच त्याच कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी दिली जात असल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. महायुतीचे सरकार सत्तेत असल्याने विकासकामांना पाठबळ मिळावे, यासाठी कार्यकर्त्यांनी श्री. कदम यांची भेट घेऊन पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी मिरज तालुक्यातील सोनी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील, द्राक्ष बागायतदार संघसंचालक जयसिंह चव्हाण, करोली एमचे माणिक तोडकर, काकडवाडीचे संजय पाटील, चाबुकस्वरवाडीचे विश्वजित काळे, आरिफ मलिदवाले, शब्बीर मुल्ला यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. या वेळी माजी नगराध्यक्ष डॉ. महादेव कुरणे, ‘जनसुराज्य’चे जिल्हाप्रमुख आनंदसागर पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. पंकज म्हेत्रे, जिल्हा उपप्रमुख चेतन कलकुटगी, योगेश दरवंदर, शहराध्यक्ष विनायक रुईकर, जितेंद्र धोंड, विनायक शरबंदे आदी उपस्थित होते.