भ्रष्टाचार अन् सावळय़ा कारभारातून माया गोळा करणारे काँग्रेसवाले पैसे व सत्तेने माजलेत. सहकारातील या प्रस्थापितांनी सहकार चळवळच पोखरून खाल्ली असल्याचा हल्लाबोल राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी चढवला. सातारा जिल्हा कोणाची मक्तेदारी नसून, चांगल्या लोकांना बरोबर घेऊन सर्व निवडणुका लढवा, यश निश्चित असेल असा विश्वास त्यांनी दिला.
‘बलशाली स्वराज्यासाठी भाजपचे सभासद व्हा’ अशी हाक देत कराड दक्षिणमधील भाजपच्या पंचवीस हजार सभासद नोंदणीचा टप्पा पूर्ण करण्यात आला. निमित्ताने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. भाजपच्या संघटन शाखेचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र भुसारी, राज्याचे निवडणूक शाखेचे प्रमुख व प्रदेश सहसंघटक श्रीकांत भारतीय, सभासद नोंदणी कार्यक्रमाचे महाराष्ट्राचे प्रमुख उज्ज्वल केसकर, जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील, डॉ. अतुल भोसले, शहराध्यक्ष घनश्याम पेंढारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बापट म्हणाले, की अतुल भोसलेंसारखे सक्षम नेतृत्व आज पक्षात आहे. त्यांना येथील नेतेच मानतो. तरी त्यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचे नेतृत्व करावे. सातारा जिल्हापरिषद ताब्यात घेण्यासाठी लगेचच मोर्चेबांधणीला सुरुवात करावी. केंद्रात अन् राज्यात भाजपची सत्ता असल्याने पक्ष ताकदीने भक्कम करा. मजबूत संघटन शासनाच्या पाठीशी उभे करा. उच्चांकी सभासद नोंदणीसाठी सक्रिय रहा. लबाडांना थारा देऊ नका, तर चांगल्या लोकांना बरोबर घेऊन सर्व संस्थांच्या व सर्व त्या सार्वजनिक निवडणुका लढवा. काँग्रेस आघाडीने लोकांवर अन्याय केले आहेत. तरी अन्यायाचा जाब विचारण्यासाठी प्रसंगी हातात चाबूक घ्या. काही अडचणी येत असतील तर संघर्षांस उतरा, पक्षाला चांगल्या माणसांची अन् चांगल्या माणसाला भाजपची गरज आहे. ही परिस्थिती गांभीर्याने घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress destroyed cooperative movement
First published on: 01-02-2015 at 04:00 IST