नगर दक्षिण मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव राजळे यांनी प्रचाराला सुरुवात केली असली तरी त्यांच्या प्रचारापासून, आघाडीतील काँग्रेस पक्ष लांबच आहे. राजळे प्रचारात विश्वासात घेत नसल्याची काँग्रेसच्या अनेक पदाधिका-यांची भावना आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आ. जितेंद्र आव्हाड यांनी राजळे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात अनेक ठिकाणी सभा घेतल्या, माात्र बहुतेक ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी व्यासपीठावर अनुपस्थित होते. आधी राजळे यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत निर्माण झालेला असंतोष शमू द्या, नंतरच सक्रिय व्हा, अशा सूचना प्रमुख पदाधिका-यांना जिल्हय़ातील काँग्रेस नेत्यांनी केल्याचे समजले.
जिल्हय़ातील काँग्रेस अंतर्गत विखे गटाचे व राजळे यांचे फारसे सख्य नाही, परंतु राजळे हे थोरात गटातील पदाधिका-यांनाही विश्वासात घेत नसल्याची काँग्रेसजनांची तक्रार आहे. त्यामुळे काँग्रेसमधील दोन्ही गट अद्याप प्रचारात फारसे सक्रिय नाहीत. उलट अनेक ठिकाणी त्यांची अनुपस्थिती लगेच निदर्शनास येणारी ठरत आहे. त्याची चर्चाही जिल्हय़ात होत आहे. राष्ट्रवादीत उमेदवारीवरून आधीच नाराजी, आता आघाडीतील काँग्रेस पदाधिकारीही प्रचारापासून लांब, अशा परिस्थितीत राजळे यांच्याकडून ही कोंडी फोडण्यासाठी प्रयत्नही होताना दिसत नाहीत, असेही काँग्रेसच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने निदर्शनास आणले.
काही दिवसांपूर्वी राजळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. पवार यांच्या उपस्थितीमुळे त्या वेळी काँग्रेसचे काही पदाधिकारी प्रचार सभेस उपस्थित राहिले खरे, मात्र त्यानंतर सध्या असलेली परिस्थिती यात जमीन-अस्मानचे अंतर पडले आहे. त्या वेळीही काँग्रेसचे दोन मंत्री बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे यांनी एकत्रित व्यासपीठावर येणे टाळलेच होते, त्यातूनही त्यांच्या पदाधिका-यांना संदेश मिळाला होताच.
तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आव्हाड यांनी नगरसह काही ठिकाणी सभा घेतल्या, बहुतेक ठिकाणी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी अनुपस्थित होते. नगर शहरात माळीवाडा वेशीजवळ सभा घेण्यात आली. परंतु काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांसह सर्वच प्रमुख अनुपस्थित होते. या सभेचे साधे निमंत्रणही ब्रीजलाल सारडा यांना दिले गेले नव्हते. राजळे आघाडीचे उमेदवार असताना सभेच्या फलकावर एकाही काँग्रेस नेत्याची छबी झळकली नाही, याकडे लक्ष वेधले जात आहे. सभेनंतर चौकशी करता, एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने अद्याप नेत्यांचे आदेश प्राप्त नाहीत, असेही निदर्शनास आणले होते.
तीच गत कर्जत व जामखेड येथील सभेच्या वेळी घडली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी महसूलमंत्री थोरात गारपिटीची पाहणी करण्यासाठी कर्जतमध्ये होते. त्या वेळीही थोरात यांनी तालुक्यातील राजकीय परिस्थितीची माहिती घेतली. त्याच वेळी थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, आधी त्यांच्यातील (राष्ट्रवादी) ‘पॅचअप’ तर होऊ द्या, अशी सूचना करत सबुरीचा सल्ला दिल्याचे खात्रीलायकरीत्या समजले. अशीच काहीशी परिस्थिती जामखेडमध्ये विखे गटाची आहे. नेत्याकडून अद्याप काही सूचना नसल्यानेही अपवाद वगळता काँग्रेसजनांची अनुपस्थितीच होती.