भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या वेबसंवादात बोलताना भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी युती होणार असल्याचा दावा केलाय. मात्र आता या दाव्यावरुन राज्यातील राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शेलारांच्या या दाव्यावर काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राज्याचे सध्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली केलेल्या एका वक्तव्याची आठवण करुन देत आशिष शेलारांवर कारवाई करण्याची मागणी केलीय.

नक्की वाचा >> शिवसेना, NCP, BJP युती होणार होती म्हणणाऱ्या आशिष शेलारांना अजित पवारांचा टोला; म्हणाले “ते मोठे नेते आहेत, त्यांच्याशी पवार साहेब…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेलार नेमकं काय म्हणाले?
“भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी संयुक्त सरकारची २०१७ मध्येच सारी तयारी झाली होती. राष्ट्रवादीची खाती, लोकसभेच्या किती जागा लढायच्या याची सारी चर्चा भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर झाली होती. शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास राष्ट्रवादीने विरोध केल्याने त्रिपक्षीय सरकार तेव्हा स्थापन झाले नव्हते. पण २०१९ मध्ये त्याच शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने सलगी गेली. तर शिवसेनेने सत्तापिपासूपाणाचा परमोच्च बिंदू गाठत काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली,” अशी टीका शेलार यांनी केली.

काँग्रेसची प्रतिक्रिया
काँग्रेस वगळता तीन महत्वाचे पक्ष २०१७ मध्ये एकत्र येणार होते असा दावा करणाऱ्या आशिष शेलार यांना टॅग करत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीसांचं २०१४ मधील एका ट्विटचा स्क्रीनशॉर्ट पोस्ट केलाय. या ट्विटमध्ये सावंत यांनी आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टॅग केलंय.

ट्विटमध्ये फडणवीस काय म्हणतायत?
सावंत यांनी शेअर केलेलें फडणवीस यांचं ट्विट २६ सप्टेंबर २०१४ चं आहे. या ट्विटमध्ये फडणवीस यांनी, “भाजपा कधी, कधी, कधीच राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही. अफवा काही हेतूने पसरवल्या जात आहेत. आम्ही विधानसभेत त्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला तेव्हा इतर (पक्ष) शांत बसले होते,” असं फडणवीस यांनी ट्विट केलेलं.

काँग्रेसने केली शेलारांवर टीका
हे ट्विट शेअर करत सावंत यांनी फडणवीसांचा अपमान शेलारांनी केल्याचा टोला लगावलाय. “अशा तऱ्हेचे वक्तव्य करुन आशिष शेलार यांनी सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. स्वपक्षीय नेत्याच्या शब्दांवर विश्वास ठेवू नये असे ते जनतेला सांगत आहेत. भाजपाने तात्काळ शेलार यांच्यावर कारवाई करावी अन्यथा चंद्रकांत पाटील यांचेही तेच मत आहे असे दिसेल,” अशी कॅप्शन सचिन सावंत यांनी हे ट्विट शेअर करताना दिलीय.

अजित पवारांचा सल्ला…
दरम्यान, शेलार यांच्या या दाव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. “२०१७ ला काय झालं, तेव्हा नेते काय बोलत होते आता काय बोलत होते यापेक्षा आत्ता जनतेसमोर काय प्रश्न आहे, समस्या काय आहेत, याकडे लक्ष दिले पाहिजे,” असा टोला अजित पवार यांनी शेलार यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता लगावला. पुढे बोलताना त्यांनी राज ठाकरेंचेही उदाहरण दिलं. “राज ठाकरे यांनी २०१९ ला भाजपावर टीका केली होती, आघाडीच्या उमेदवार यांना पूरक अशी अप्रत्यक्ष भूमिका घेतली होती. आता तर ते क्लियर क्लियर महाविकास आघाडी विरोधात भूमिका घेत आहेत,” असंही म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress first comment on ashish shelar saying ncp shivsena and bjp was planning alliance in 2017 scsg
First published on: 28-04-2022 at 13:39 IST