scorecardresearch

“माझ्यामुळेच सत्ता आली”, राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या आधी अशोक गेहलोत – सचिन पायलट यांच्यात पुन्हा धुसफुस

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? यावरुन काँग्रेस नेत्यांमध्ये वर्चस्वाची स्पर्धा दिसत आहे.

Ashok Gehlot vs Sachin Pilot
मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट

राजस्थानमध्ये काँग्रेस नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धुसफुस पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या आधीच राज्यात मीच कसा काँग्रेसचा तारणहार आहे, हे दाखविण्यासाठी गेहलोत यांनी बाह्या सरसावल्या आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी सत्ता त्यांच्यामुळेच आली होती, असे सभांमधून सांगायला सुरुवात केली आहे. मी २०१३ ते २०१८ या काळात प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांना घेऊन मेहनत घेतली, त्यामुळेच पक्षाला सत्ता प्राप्त झाली, असा दावा पायलट यांनी केला आहे. तर यावर पलटवार करताना अशोक गेहलोत म्हणाले की, माझ्या नेतृत्वाखालील सरकारने मागच्या वेळेस केलेल्या कामांमुळेच पक्षाला पुन्हा सत्ता मिळाली.

काँग्रेसचे १५६ जागा जिंकण्याचे लक्ष्य

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत १५६ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. माझ्या मागच्या सरकारच्या काळातील कामामुळेच २०१८ साली जनतेचे बहुमत मिळाले होते, असा दावा त्यांनी केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर सवाई मानसिंह स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. ते म्हणाले, “आम्ही जेव्हा १९९८ मध्ये सरकार स्थापन केले. तेव्हा आमच्याकडे १५६ जागा होत्या. त्यावेळी मी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष होतो. त्यामुळे यावेळी देखील आम्ही मिशन १५६ हाती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर निशाणा साधताना मागच्या सरकारमध्ये असताना केलेल्या कामांची उजळणी केली.”

सचिन पायलट म्हणतात युवकांना संधी द्या

सचिन पायलट यांनी युवकांना संधी दिली जावी ही मागणी वारंवार मांडली आहे. पक्षातील ज्येष्ठ मंडळींनी आता युवकांना संधी देण्याबाबत विचार करावा, असे बोलताना त्यांनी अशोक गेहलोत यांच्यावरच एकप्रकारे अंगुलीनिर्देश केले आहे. अशोक गेहलोत बाजूला झाल्यास सचिन पायलट हे काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील. पायलट असेही म्हणाले की, २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांची संख्या २१ वर आली होती. त्यावेळी पक्षाने माझ्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती.

पायलट यांच्या या वक्तव्यावर गेहलोत यांनी त्यांचे नाव न घेता पलटवार केला. ते म्हणाले की, २०१३ साली विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा सामना करावा लागला होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर केवळ सहा महिन्यातच जनतेला मी केलेली आधीची कामे आठवायला लागली आणि तेच २०१८ साली पुन्हा सत्तेत येण्याचे कारण होते. सध्या भाजपाकडे आमच्या सरकारच्याविरोधात कोणताही मुद्दा नाही. जनता देखील आमच्यावर नाराज नाही. त्यामुळे आमचेच सरकार पुन्ह येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तरिही पायलट – गेहलोत यांच्यातले वाकयुद्ध थांबलेले नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 19:49 IST
ताज्या बातम्या