“जे भारतीय जनता पक्षाच्या पोटात आहे तेच गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगनाच्या मुखातून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे. कंगणाला पुढे करून मुंबई पोलीस, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही,” असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट कोणी रचला आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत. कंगveचा बोलविता धनी कोण आहे हे उघड असून आपल्या राजकीय स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे,” असे थोरात म्हणाले.

“ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगना राणौतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्याच मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आणि महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी जनतेचा अपमान आहे. कंगणाने केलेल्या एकाही वक्तव्याचा भाजपाने निषेध केला नाही. त्यांचे मौन हेच त्यांचा पाठिंबा असल्याचे दाखवत आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येचा मुद्दाही राजकीय करुन त्याचा लाभ उठवण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली आहे,” असे त्यांनी नमूद केलं.

… तेव्हापासून ही मंडळी अस्वस्थ

महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांचे आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही मंडळी अस्वस्थ आहेत. हे सरकार कोणत्याही मार्गाने खाली खेचायचे यासाठी मागील नऊ महिन्यापासून या लोकांनी सर्व उद्योग करुन पाहिले. सुरुवातीला राजभवनच्या आडून सरकार अस्थिर करण्याचे उद्योग केले, त्यात त्यांना यश आले नाही. कंगणासारख्या अभिनेत्रीला हाताशी धरुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम केले आणि आता तर या मंडळींची मजल मुंबईला पाकव्यात काश्मीर म्हणण्यापर्यंत गेली. भाजपाला ना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम आहे, ना महाराष्ट्राच्या जनतेबद्दल, त्यांना फक्त राजकीय पोळी भाजायची आहे, पण त्यांना कदापी यश येणार नसल्याचं थोरात म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader minister balasaheb thorat criticize bjp bollywood actress kangana ranaut mumbai pok statement jud
First published on: 04-09-2020 at 20:53 IST