बीड : आमच्या मुलीस न्याय द्या, अशी मागणी करणाऱ्या फलटण येथील मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांस विशेष तपास पथक स्थापन करण्यासाठी दबाव वाढवू, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दूरध्वनीवरून दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या प्रकरणातील लागेबांधे शोधून काढण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेईल, असे ते म्हणाले.

राज्यभरात गाजत असलेल्या फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात तपासासाठी विशेष तपास पथक नेमावे, अशी मागणी काँग्रेसने केली. महिला डॉक्टरच्या आईने माझ्या लेकीला न्याय द्यावा, अशी मागणी केली. या कुटुंबीयांशी संवाद साधताना या प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. सरकारवर मी दबाव आणण्याचा प्रयत्न करेन, असे ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा पोलीस प्रशासनावर थेट दबाव आहे. त्यामुळे पोलीस चौकशी करत नाहीत. खरे तर महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे. सत्ताधारी आमदार या प्रकरणात बोलत नाहीत. त्यांच्यावरदेखील फडणवीस यांचा दबाव आहे, असे सपकाळ म्हणाले. या प्रकरणात नारायणगड आणि भगवानगडाने न्याय देण्यासाठी भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. पंकजा मुंडे यांनी तर आक्रमक होऊन मंत्रिमंडळात राहायचे की नाही, याचा निर्णय घ्यावा आणि न्याय मिळवून द्यावा, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.