कोल्हापूर : पुणे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी इचलकरंजी महानगर काँग्रेस समितीने प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे केली.
त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबनेचा प्रकार पुढे आला आहे. देशाला अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम महात्मा गांधींनी केले. त्या काळापासूनच गांधींचा द्वेष करणारी प्रवृत्ती देशांमध्ये तयार झाली आहे. यापूर्वीही त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रवृत्तीला रोखण्यासाठी पुतळा विटंबना करणाऱ्या व्यक्तीस पकडून कठोर कारवाई करण्यात यावी.
निवेदनावर प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर, बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई, किशोर जोशी, अजित मिनेकर, सचिन साठे, दीपक शिंदे, चंद्रकांत कांबळे आदींच्या सह्या आहेत.