सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार राम सातपुते आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. आमदार सातपुते यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना त्यांच्या मालमत्तेचा हिशेब देण्याचे आव्हान दिले होते. राम सातपुते यांनी दिलेल्या आव्हानानंतर आता प्रणिती शिंदे यांनी त्यांना सोलापूरच्या प्रचार सभेत जशास तसे उत्तर दिले आहे. “माझ्या वडिलांना काय बोलता? भिडायचे असेल तर माझ्याशी भिडा, मी निवडणुकीला उभी आहे”, असे त्या म्हणाल्या आहेत.

प्रणिती शिंदे नेमके काय म्हणाल्या?

“सुशीलकुमार शिंदे साहेब लोकांसाठी रात्रंदिवस काम करत आहेत, आणि तुम्ही त्यांना हिशेब विचारता? यावरून तुमचे संस्कार कळतात. ज्यांना संस्कार दिले गेले नाहीत ते सर्व एकत्र आले आहेत. माझ्या विरोधात जे उभे आहे, त्यांना तुम्ही (लोक) पार्सल म्हणता. मात्र, मी काही म्हणणार नाही. आत ते काही दिवसांपासून सुशीलकुमार शिंदे यांच्यावर बोलत आहेत. आरे भिडायचे असेल तर माझ्याशी भिडा, मी निवडणुकीला उमेदवार म्हणून उभी आहे. माझ्या वडिलांना का बोलता?”

“ज्या माणसाने आयुष्यभर संघर्ष केला. सुशीलकुमार शिंदे यांचा संघर्ष संपूर्ण सोलापुरकरांना माहिती आहे. तरीही असे बोलायला लाज वाटायला पाहिजे. ते जरी बोलले तरी मी त्यांच्या वडिलांवर कधी बोलणार नाही. कारण आपण सुसंस्कृत लोक आहोत. त्यांना जर बोलायचे असेल तर माझ्या कामाबद्दल बोला. गेले १५ वर्ष लोक मला निवडून देत आहेत. तरीही तुम्ही म्हणता की संघर्ष केला नाही. हा माझा नाही, लोकांचा अपमान आहे”, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांच्यावर केली.

हेही वाचा : VIDEO : सुनील तटकरेंवर शेकापच्या जयंत पाटीलांची शेलक्या शब्दांत टीका

राम सातपुते काय म्हणाले होते?

“माझे आई-वडील ऊसतोड कामगार होते. आम्ही साध्या झोपडीत राहायचो. माझे शिक्षण बी. टेकपर्यंत झाले. पत्नीही बी. टेक असून तिची आयटी कंपनी आहे. बँकेचे कर्ज काढून बंगला बांधला आहे. त्याचा संपूर्ण हिशेब मी द्यायला तयार आहे. मात्र, वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेले सुशीलकुमार शिंदे यांनीही त्यांनी कमावलेल्या मालमत्तेचा हिशेब द्यावा”, असे राम सातपुते यांनी म्हटले होते.