विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना विधानभवनाच्या बाहेर देखील हेच चित्र दिसून येत आहे. बुधवारी सकाळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन आणि घोषणाबाजीदरम्यान धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधी पक्षाच्या आमदारांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा दावा आमदार अमोल मिटकरींनी केलेला असताना आमदारांनी विधानभवन परिसरात वागताना संयम बाळगला पाहिजे, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी यावरून सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.

नेमकं घडलं काय?

आज सकाळी विधिमंडळाचं कामकाज सुरु होण्याआधी विधानभवनाच्या बाहेरच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडले. विरोधकांकडून ‘५० खोके एकदम ओके अन् खाऊन खाऊन माजलेत बोके!’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र, याचदरम्यान तिथे सत्ताधारी पक्षाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपस्थित असल्याने विरोधकांनी आमची जागा हायजॅक केल्याचा आरोप केला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अक्षरश: एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र निर्माण झालं. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार वाद झाला.

दरम्यान, या प्रकारावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले जात असताना काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.

आमदारांना झालेल्या धक्काबुक्कीवरून अजित पवारांची शिंदे गटावर टीका; म्हणाले, “ती पन्नास खोक्यांची घोषणा…”

लोकप्रतिनिधींकडून संयम पाळला गेला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना त्यावरून ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांवरच आरोप केला आहे. “संयम पाळला गेलाच पाहिजे. पण तुम्ही जर फक्त विरोधकांकडून संयम पाळला जाण्याची अपेक्षा करत असाल, तर हे चुकीचं आहे. कारण सत्ताधाऱ्यांचेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. सभापतीही त्यांचेच आहेत. त्यामुळे अशा प्रकारे विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो निंदनीय आहे”, असं यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्या प्रकारे आमदारांना पळवण्याचा प्रयत्न केला गेला…”

दरम्यान, यावेळी सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरून देखील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “ज्या प्रकारे सत्ताबदल करण्याचा प्रयत्न केला गेला, आमदारांना पळवण्याचा प्रयत्न केला गेला, तो असंवैधानिक आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. आमची अपेक्षा न्यायव्यवस्थेकडून आहे. मात्र, तिथेही ‘जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड’ असं होत आहे. त्यामुळे जर विरोधक दबावगट करून सत्य बोलत असतील, तर सत्ताधाऱ्यांनी अशा प्रकारे वागणं चुकीचं आहे”, असं यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.