माजी मुख्यमंत्री नारायण राणे गेल्या सप्टेंबरात काँग्रेसमधून बाहेर पडले आणि चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी गेल्या बुधवारी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. या दोन राजकीय घटनांच्या निमित्ताने कोकणातील काँग्रेस पक्ष बऱ्याच काळानंतर चर्चेत आला. पण त्यातून एवढेच प्रकर्षांने जाणवले की, प्रभावी नेते आणि कार्यकर्त्यांअभावी सध्या येथे या पक्षाची अवस्था रिकाम्या धर्मशाळेसारखी अवस्था झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर थोडे इतिहासात डोकावले तर असे दिसते की, १९८१ मध्ये विभाजन होण्यापूर्वी असलेल्या रत्नागिरी जिल्हय़ातील विधानसभेच्या सर्व, अकराही जागांवर काँग्रेसचेच आमदार विजयी होत असत आणि विभाजनानंतर निर्माण झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ासह कोकणात हाच दबदबा १९९० पर्यंत कायम राहिला. त्याच वेळी लोकसभेवर मात्र आधी कै. बॅ. नाथ पै आणि त्यानंतर कै. प्रा. मधू दंडवते या समाजवादी विचाराच्या अत्यंत कर्तबगार संसदपटूंनी कोकणचे सातत्याने प्रतिनिधित्व केले. योगायोग असा की, १९९१ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दंडवते पराभूत झाल्यानंतर ही परंपराही खंडित झाली आणि त्यानंतर मोजके अपवाद वगळता या दोन्ही जिल्हय़ांमध्ये समाजवादी विचाराचा जनता पक्ष/ जनता दल आणि काँग्रेसची न थोपवता आलेली घसरण सुरू झाली, ती आजतागायत कायम आहे. जनता पक्ष/ दल तर केव्हाच इतिहासाचा भाग बनला आहे आणि १९९५ नंतर रत्नागिरी जिल्हय़ातून काँग्रेसच्या तिकिटावर एकही आमदार निवडून आलेला नाही. ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसने बळकावली आहे. दोन्ही जिल्हय़ांमधील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे चित्रही यापेक्षा वेगळे नाही.

सिंधुदुर्ग जिल्हय़ात नारायण राणे २००५ मध्ये काँग्रेसवासी झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत स्वत: राणे आणि शंकर कांबळी निवडून आले. पण त्यानंतर २००९ मध्ये एकटे राणे आणि २०१४ च्या निवडणुकीत त्यांचे धाकटे चिरंजीव नीतेश निवडून आले. आता राणे यांनी आपली सारी फौज महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाच्या झेंडय़ाखाली गोळा केल्यामुळे मूळच्या काँग्रेस पक्षाची स्थिती वऱ्हाडी निघून गेलेल्या मंगल कार्यालयासारखी झाली आहे.

या पाश्र्वभूमीवर, माजी आरोग्यमंत्री भाई सावंत यांचे चिरंजीव विकास सावंत यांच्यावर आता सिंधुदुर्ग जिल्हय़ाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसने सोपवली आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यात प्रभावी असलेले जातीचे गणित जुळवण्यासाठी कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पण या दोघांच्या राजकीय पुनर्वसनापलीकडे त्यामुळे फार फरक पडण्याची शक्यता नाही.

सव्वाशे वर्षांची देदीप्यमान परंपरा सांगणाऱ्या पक्षाची कोकणात १९९० नंतर घुसलेल्या ‘भगव्या’ वादळाने अशी अवस्था करून टाकली, हे अंशत: खरे आहे. पण त्यापेक्षाही, प्रभावी स्थानिक नेतृत्व आणि संघटनात्मक बांधणीचा अभाव, हे जुने दुखणे मुख्य कारण आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांची कोकणात ही अवस्था आहे. त्याचा पुरेपूर लाभ येथील वाडय़ा-वस्त्यांपर्यंत पोचलेली शिवसेना घेत आली आहे आणि आता अचानक जाग आल्यासारखे दोन्ही राष्ट्रीय पक्ष कामाला लागले आहेत.  रमेशभाईं कदमा यांनी गेल्या बुधवारी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना, शून्य परिस्थितीतून वटवृक्ष निर्माण करण्याची आपली ताकद असल्याची वल्गना केली आहे. काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनीही, सध्या राज्यभरच ‘जे का रंजले गांजले.’ अशी भूमिका घेण्याची वेळ आली असल्यामुळे, भाईंमुळे कोकणात पक्ष उभारी घेईल, असे उसने अवसान आणून म्हटले आहे. पण प्रत्यक्षात चिपळूण नगर परिषदेतील अवघे ४ सदस्य, त्यापैकीही तिघे अजून राष्ट्रवादीमध्येच थांबलेले, असे अगदी नगण्य बळ असलेल्या कदम यांचा पुढे कितीसा प्रकाश पडणार याची सर्वानाच जाणीव आहे. त्यातून आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा राष्ट्रवादीशी आघाडी झाली तर ज्यांचे तोंड पाहण्याचीही इच्छा नाही, असे राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी भास्कर जाधव यांच्याबरोबर बैठकीला बसण्याची वेळ ते कशी निभावून नेणार, हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे तूर्त तरी कवी आरती प्रभूंच्या शब्दात सांगायचे तर, पोटाशी धरणारा आणि पोटाशी धरला गेलेला, दोघांनाही एकमेकांचा आधार आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party fined activists in konkan
First published on: 25-11-2017 at 01:28 IST