नवी दिल्ली :राजस्थानमधील नेते आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण एकजूट राखली तर तिथे वर्षांच्या अखेरीस होणारी विधानसभा निवडणूक जिंकता येईल असा विश्वास काँग्रेसने गुरुवारी व्यक्त केला. तसेच सर्व नेत्यांनी शिस्त पाळावी आणि पक्षाच्या व्यासपीठाबाहेर बोलू नये असे निर्देश पक्षातर्फे देण्यात आले. पक्षात एकजूट राहिली तर आतापर्यंत राज्यात सत्ताधारी पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव होण्याची परंपरा खंडित करता येईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी राजस्थान निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. त्याला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, पक्षाचे राजस्थानचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा, प्रदेशाध्यक्ष गोविंग सिंह डोटासरा आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित होते. दुखापतीतून सावरत असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे दूरदृश्य प्रणालीतर्फे बैठकीला उपस्थित होते.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात उमेदवारांची यादी निश्चित केली जाईल आणि जिंकून येण्याची क्षमता हा एकमेव निकष लावून उमेदवारी दिली जाईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शुक्रवारपासून राज्यात घरोघरी संपर्काची मोहीम राबवली जाणार असून त्यामध्ये लोकांना राज्य सरकारद्वारे हाती घेण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली जाईल. बैठकीनंतर वेणुगोपाल यांनी पत्रकारांना सांगितले की, संपूर्ण एकजूट असली तर काँग्रेसला विधानसभा निवडणूक जिंकता येईल यावर सर्व नेत्यांचे मतैक्य झाले. मात्र, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये काही शांततेचा तोडगा काढण्यात आला का याविषयी त्यांनी काही सांगितले नाही. तसेच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आधी जाहीर केला जात नाही, निवडून आलेले आमदार त्यावर निर्णय घेतील असे ते म्हणाले.
पायलट यांचा सकारात्मक सूर
या बैठकीनंतर राज्यातील काँग्रेसचे असंतुष्ट नेते सचिन पायलट यांनी सकारात्मक सूर लावला. ही बैठक अर्थपूर्ण आणि सर्वंकष होती आणि पक्षाने तरुणांच्या दृष्टीने महत्त्वाचे, भ्रष्टाचाराचे मुद्दे विचारात घेतले, यामुळे आपण आनंदी असून एकजुटीने निवडणूक लढवून जिंकू असे ते म्हणाले. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस समिती आपल्याला जो आदेश देईल तो आपल्याला मान्य असेल असे त्यांनी सांगितले.