राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत केलेल्या विधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘महाविकास आघाडीची एकत्र लढण्याची इच्छा आहे. पण, इच्छा नेहमी पुरेशी नसते’, असं वक्तव्य शरद पवारांनी अमरावतीत केलं होतं. या विधानानंतर चर्चांना उधाण आलं आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार का? वंचित आघाडीही बरोबर असेल का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने शरद पवारांना विचारला. त्यावर त्यांनी म्हटलं, “वंचित आघाडीबरोबर २०२४ च्या निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही. वंचितशी आमची चर्चा कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीपूर्ती मर्यादित आहे. दुसरी कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच, महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची इच्छा आहे. पण, इच्छा नेहमीच पुरेसी नसते. जागा वाटपाबद्दल अजून ठरलेलं नाही.”

हेही वाचा : “मी फकीर, मग झोळी लटकवून…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले…

“शेतकरी, तरुण पिढीला उद्ध्वस्त केलं जात आहे”

शरद पवारांच्या विधानावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “भाजपाच्या विरोधात जे राजकीय पक्ष आहेत, त्यांना एकत्र घेऊन लढण्याची काँग्रेसची भूमिका आहे. आमच्याबरोबर युतीत असलेल्या लोकांचे विचार वेगळे असू शकतात. मात्र, देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. देशाचं वाटोळं करण्याचं काम सुरू आहे. शेतकरी, तरुण पिढीला उद्ध्वस्त केलं जात आहे. महागाई आणि गरिबीमुळे लोक त्रस्त आहेत.”

“या परिस्थितीत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जे आमच्याबरोबर राहतील त्यांना घेऊन लोकशाही वाचवण्याची लढाई आम्ही लढू,” असं नाना पटोलेंनी सांगितलं आहे.

हेही वाचा : ‘त्या’ फोटोंवरून अमोल कोल्हे भाजपात जाण्याच्या चर्चा; खुलासा करताना म्हणाले, “मला हे सुचवायचंय की…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पवारांच्या विधानांचा चुकीचा अर्थ घेतला जातो”

शरद पवारांच्या विधानावर संजय राऊतांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं. त्यावर संजय राऊत म्हणाले, “शरद पवारांच्या विधानांचा वेगळा अर्थ काढला जातोय. या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. महाविकास आघाडीच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेतोय? तर आम्ही एकत्र आहोत हे सांगण्यासाठीच. १ मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची ऐतिहासिक सभा होत आहे. त्या सभेला तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते उपस्थित राहतील. पुणे, कोल्हापूर अशाही सभा होणार आहेत”, असं संजय राऊतांनी म्हटलं.