कराड, : काँग्रेसमधील उंडाळकर व चव्हाण गटामध्ये गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेला संघर्ष ऐन निवडणुकीत टोकाला गेल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या अससेल्या ‘कराड दक्षिण’च्या या लढतीत पक्षाचे ज्येष्ठ व बंडखोर नेते विलासकाका उंडाळकर हे सध्या रोज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सडकून टीका करत आहेत. विशेष म्हणजे विलासकाकांकडून होणाऱ्या सततच्या टीकेला पृथ्वीराज चव्हाण उत्तरच देत नसल्याने राजकीय वर्तुळासह सजग नागरिकांमध्ये याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण हें तत्कालीन मुख्यमंत्री असल्याने हा ‘राज्याच्या नेतृत्वाचा चेहरा’ म्हणून कराड दक्षिणच्या जनतेने पृथ्वीराजांना साजेसा विजय मिळवून दिला. त्या वेळीही विलासकाका उंडाळकरांची बंडखोरीच चव्हाणांची मोठी डोकेदुखी होती. त्या वेळी पृथ्वीराज चव्हाणांना ३७.९६ टक्के तर त्यांचे प्रतिस्पर्धी व काँग्रेसचेच माजी मंत्री व ‘कराड दक्षिण’मधून ७ वेळा मोठय़ा मताधिक्याने जिंकलेल्या विलासकाका उंडाळकरांना २९.८५ टक्के मते मिळाली होती. भाजपचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई डॉ. अतुल भोसले यांना २८.९६ टक्के मते मिळाली होती.  त्या निवडणुकीत पृथ्वीराजांकडे सत्तेची कुमक होती. आज मात्र, सत्ता विरोधकांकडे राहताना भाजपने सत्तेच्या माध्यमातून डॉ. अतुल भोसलेंचे कडवे आव्हान उभे केले आहे. यात भर म्हमून या खेपेसही चव्हाणांच्या मागे उंडाळकरांच्या विरोधाचा ससेमिराही कायम आहे. विलासकाकांनी आपले पुत्र अ‍ॅड. उदयसिंहांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवताना पृथ्वीराज चव्हाणांवर जुने दाखले देत त्यांना आपल्या भाषणांमध्ये टीकेचे लक्ष्य केले आहे.

ठिकठिकाणच्या सभांमध्ये उंडाळकरांनी म्हणतात, की लोकसभेच्या १९९९ मधील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांकडून पराभूत झालेल्या पृथ्वीराज चव्हाणांना त्यांच्याच पाटण तालुक्यातून केवळ ५ हजार मते मिळाली होती. परंतु, त्या वेळी आपण प्रतिनिधित्व करीत असलेल्या कराड दक्षिणने चव्हाणांची निवडणुकीतील अनामत रक्कम वाचवली होती. अशा लोकप्रिय उमेदवार पृथ्वीराज चव्हाणांनी नेहमीच आयत्या पिठावर रेघोटय़ा ओढण्याचे काम केले.

प्रशासकीय इमारती उभारल्या म्हणजे विकास नव्हे, असे मत मांडताना सत्ता असताना कराड शहरासाठी काय विकास साधला, काँग्रेसचा काय जनाधार वाढवला असे सवाल उंडाळकरांनी पृथ्वीराज चव्हाणांना केले आहेत. तळहताच्या फोडाप्रमाणे आपण, सलग ३५ वर्षे ‘कराड दक्षिण’ मतदार संघ जपला. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत सत्तेच्या जोरावर पृथ्वीराज चव्हाणांनी आचार, विचार, संस्कृती उद्ध्वस्त केली. या कर्तबगार माजी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ ४२ आमदार निवडून आले. या दुरवस्थेला पृथ्वीराज जबाबदार असून, ते काँग्रेस पक्षच संपवायला निघाले असल्याची टीका विलासकाकांनी केली.

संघर्ष टोकाला

काँग्रेसमधील उंडाळकर व चव्हाण गटामध्ये गेल्या तीन दशकांपासून संघर्ष सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत हा संघर्ष टोकाला गेला आहे. यामुळे चव्हाणांबरोबर काँग्रेस पक्षही अस्वस्थ होत आहे. विशेष म्हणजे विलासकाकांकडून होणाऱ्या सततच्या टीकेला पृथ्वीराज चव्हाण उत्तरच देत नसल्याने राजकीय वर्तुळासह सजग नागरिकांमध्ये याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress rebel leader vilaskaka undalkar target former cm prithviraj chavan zws
First published on: 19-10-2019 at 00:28 IST