देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सव, दसरा-दिवाळी हे सण करोना नियमावलीत साजरे करावे लागतील असा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून देशात करोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचं दिसत आहे. केरळ राज्यात करोना वेगाने पसरत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे इतर राज्यांची धास्ती वाढली आहे. महाराष्ट्रातही काही निर्बंध शिथिल केले असले तरी सरकार सावध पावलं उचलताना दिसत आहे. लोकलपासून, दुकाने, हॉटेल यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. दरम्यान, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीने तर्फे सोमवार ३० ऑगस्टपासून राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. सचिन सावंत यांनी ट्वीट करून भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात करोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्ण येण्याची शक्यता आहे. निती आयोगानेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाही सत्तेच्या हव्यासापोटी आंधळ्या भाजपाला पुन्हा मंदिरांचे राजकारण करायचे आहे. निती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार?”, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे. “जन आशीर्वाद यात्रेत करोना नियमांच्या उल्लंघनाबाबत इतके गुन्हे दाखल होऊनही भाजपाचे डोके ठिकाणावर आलें नाही. दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढण्यासाठी भाजपाचे बंगालमधील सत्तेचे राजकारण कारणीभूत ठरले. आता तिसरी लाट लवकर आणण्यासाठी मंदिरे उघडणे व दहिहंडी आयोजनाचा हट्ट करत आहेत.”, असं टीकास्त्र त्यांनी सोडलं.

श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे सकाळी ११ वाजता राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होणार असल्याची घोषणा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. या आंदोलनाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठींबा दिला आहे.याबाबत भाजपाचे मुकुंद कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे. त्यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress sachin sawant on bjp state mandir open andolan rmt
First published on: 28-08-2021 at 13:29 IST