हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. किडनी, लिव्हर (यकृत) आणि डोळे विकत घ्या, अशा घोषणा देत हिंगोलीतील शेतकरी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. कर्जमाफी, पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या इतर समस्यांसाठी या शेतकऱ्यांनी मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता काँग्रेसने सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी सरकारवर टीका केली. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार आहे. शेतकऱ्यांना किडनी आणि त्यांच्या शरीराचे अवयव विकावे लागत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्रात अशी दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर पहिल्यांदाच आली आहे, याचं आत्मचिंतन सरकारने करण्याची गरज आहे, असं काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.

हेही वाचा- “जवळच्या माणसानेच पंकजा मुंडेंचा घात केला”; बच्चू कडूंचं थेट वक्तव्य, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे सरकार नुसतंच सांगतंय की, आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय. पण खऱ्या अर्थाने राज्यातील शेतकऱ्यांवर त्यांचे अवयव विकण्याची वेळ येत असेल तर राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? याचा गांभीर्यपूर्वक विचार करण्याची आता वेळ आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या अवस्थेशी सरकारला काहीही देणंघेणं नाही. त्यांना फक्त स्वत:चं सरकार टिकवायचं आहे. त्यासाठी दिल्लीला जायचं आहे आणि वकील नेमायचे आहेत. त्यासाठी त्यांना वेळ आहे, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडे कसलाही वेळ नाही, निधी नाही,” अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली.