कराड : काँग्रेस पक्ष संपवण्याच्या वल्गना कोणी करत असले, तर काँग्रेस कधीही संपणार नाही. देशाचा व काँग्रेसचा डीएनए एकच असल्याने लोकशाही, राज्यघटना वाचण्यासाठी या पुढे काँग्रेस जोरकसपणे प्रयत्न करेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. काँग्रेसमुक्त भारतऐवजी भाजपच काँग्रेसयुक्त झाल्याचा टोला त्यांनी लगावला.
माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला हर्षवर्धन सपकाळ यांनी अभिवादन केले. प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात, रणजित देशमुख, प्रदीप जाधव आदींची उपस्थिती होती. या वेळी सपकाळ पत्रकारांशी बोलत होते.
सपकाळ म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा अशी भूमिका जाहीरपणे व्यक्त करतात. पण काँग्रेसमुक्त भारत करता- करता भाजपच काँग्रेसयुक्त झाली आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. अनेकजण अडचणीमुळे भाजप पक्षात जात असले, तरी अजूनही काँग्रेस संपलेली नाही. यातून त्यांनी काहीतरी धडा घ्यावा.
काँग्रेसचे अनेकजण आज भाजपच्या वाटेवर आहेत. परंतु, भाजपचे नेते त्यांना वेटिंगवर ठेवल्याच्या भावना व्यक्त करीत आहेत. काँग्रेस पक्षाला दीडशे वर्षांची परंपरा असून, कोणी ओसाड गावची पाटिलकी माझ्याकडे आली असे म्हणत असेल, तर ते चुकीचे असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. महाविकास आघाडी ही अपरिहार्यता होती पण, त्यामुळे काँग्रेसचे फार नुकसान झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच
काँग्रेसची भूमिका ही नेहमी भारत जोडोची राहिलेली आहे. त्यामुळे दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या, दोन कुटुंबे एकत्र आली, तर आम्हाला आनंदच होईल असा निर्वाळा सपकाळ यांनी दिला.
संघटनात्मक फेरबदल, दुरुस्त्या
काँग्रेसने २०२५ हे वर्ष संघटनात्मक वर्ष जाहीर केल्याने जिल्हानिहाय अपेक्षित फेरबदल, दुरुस्त्या होतील. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढवायच्या, की स्थानिक पातळीवर पुन्हा आघाड्या करूनच लढवायच्या, हा निर्णय जिल्हास्तरावरील नेते घेतील. तशी मोकळीक त्यांना देण्यात आल्याचे सपकाळ यांनी यावेळी सांगितले. युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी भारतीय सैन्यदल व सरकारच्या बरोबर राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या संरक्षण मंत्रिपदाच्या कार्याची हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रशंसा केली.