गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयने कारवाई केली होती. त्यामुळे देशमुखांना तुरुंगात जावं लागलं होतं. १३ महिन्याचा तुरुंगावासानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या षडयंत्राचा भाग असल्याचा गंभीर आरोप देशमुखांनी केला.

यातच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक प्रा. श्याम मानव यांनी यावर भाष्य केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा देत महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अनिल देशमुखांचं रेकॉर्डिंग माझ्या हाती आहे, असं विधान केलं. त्यांच्या या विधानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “गृहमंत्रीपदाचा उपयोग विरोधकांना धमकावण्यासाठी करता आहात का?”, असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

हेही वाचा : Raj Thackeray : राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा; स्वबळाचा नारा देत म्हणाले, “आपण इतक्या जागांवर…”

नाना पटोले काय म्हणाले?

“केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील राजकारणाची स्थिती बदलून गेली आहे. जे लोक भाजपाच्या विरोधात असतील त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयोग मोठ्या प्रमाणात झाला. हा प्रयोग महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात झाला. जे लोक त्यांच्याबरोबर गेले त्यांना सर्व आरोपांमधून मुक्त करण्यात आलं. त्यांच्यावरील ईडीच्या कारवाया थांबवण्यात आल्या. त्यांना क्लिन चीट देण्यात आली. आता आपण पाहिलं की, अनिल देशमुखांनी जे काही आरोप केले आहेत, त्यामध्ये सत्यता असेल. सत्तेचा दुरुपयोग भाजपा करत आहे”, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.

पटोले पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम ईडी आणि सीबीआयच्या नजरेमध्ये होते. अनेकांनी याबाबत बोलूनही दाखवलं. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या वायकरांनी मी नाईलाजाने इकडे आलो, असं सांगितलं होतं. एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम हे सर्व ईडी आणि सीबीआयच्या धाकाने भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागले. तोच प्रयोग अनिल देशमुख यांच्यावर केला गेला असेल. आता ते त्या सर्व गोष्टींचा खुलासा करत आहेत”, असंही पटोले म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की माझ्याकडे काही रेकॉर्डिंग आहेत. मग तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात ना? मग तुम्ही का थांबले? फक्त निवडणुकीच्या तोंडावर धमकावण्यासाठी तुम्ही थांबला आहात का? तुम्ही संविधानाची शपथ घेऊन राज्याचे गृहमंत्री झाले आहात. तुम्ही वस्तुस्थिती मांडली पाहिजे. राज्यात ड्रग्जचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. नवीन पिढीला बरबाद करण्याच काम सुरु आहे. मग ड्रग्ज माफियांना तुम्ही ससून रुग्णालयात फाईव्ह स्टार सुविधा देतात, अशा पद्धतीचं चित्र या महाराष्ट्रात आहे. मग गृहमंत्रीपदाचा उपयोग विरोधकांना धमकावण्यासाठी करता आहात का? हा प्रश्न निर्माण झाला आहे”, अशा शब्दांत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.